Join us

राणीच्या बागेत उद्याही मारता येणार फेरफटका; पालिका प्रशासनाचा महत्वपूर्ण निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2024 16:18 IST

श्रीराम नवमीनिमित्त १७ एप्रिल २०२४ रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने बच्चे कंपनीला राणीच्या बागेचा आनंद लुटता येणार आहे.

मुंबई : श्रीराम नवमीनिमित्त १७ एप्रिल २०२४ रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने बच्चे कंपनीला राणीच्या बागेचा आनंद लुटता यावा म्हणून त्या दिवशी राणीची बाग खुली ठेवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवार, १८ एप्रिल राणीची बाग बंद असेल, असे पालिका प्रशासनाने सांगितले.

भायखळा (पूर्व) परिसरातील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय (राणीची बाग)  साप्ताहिक सुट्टीनिमित्त दर बुधवारी बंद असते. मात्र, पालिकेने यापूर्वी मंजूर केलेल्या एका ठरावानुसार बुधवारी सार्वजनिक सुट्टी आल्यास त्यादिवशी उद्यान व प्राणिसंग्रहालय जनतेसाठी खुले राहते, तर त्याच्या दुसऱ्या दिवशी बंद ठेवण्यात येते. त्यानुसार यावेळीही राणीची बाग या बुधवारी खुली असणार आहे. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी लहान मुलांना येथे जाऊन आनंद लुटता येणार आहे.  

एक दिवस बंद ठेवणे बंधनकारक -

आंतरराष्ट्रीय झू पार्क नियमांनुसार प्राणी संग्रहालय आठवड्यातून एक दिवस बंद ठेवणे बंधनकारक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राणीची बाग दर बुधवारी बंद असते. सुट्टीच्या दिवशी प्राण्यांना थोडी मोकळीक मिळते. देखभाल, दुरुस्ती कामे, स्वच्छता वगैरे करण्यात येतात. सतत नागरिकांच्या सान्निध्यात असल्याने त्यांना थोडा तणावमुक्त जीवन जगता येते.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाराणी बगीचाराम नवमी