मुंबई : संक्रांतीची चाहूल लागताच पतंगाची बाजारपेठ सजली आहे. विविध प्रकारच्या आकर्षक पतंग विक्रीस दाखल झाल्या आहेत, त्यामुळे पतंगाची बाजारपेठ हवेत भरारी मारण्यासाठी सज्ज झाली आहे.
मात्र, दुसरीकडे मुलांचा मोबाइलकडे वाढलेला ओढा आणि मैदानी खेळांची कमी होत असलेली आवड यामुळे पतंगविक्रीला अजून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पतंग मार्केट गोते खाऊ लागला आहे की काय, अशी भीती व्यापाऱ्यांना आहे.
मुंबईत मात्र पतंगाची बाजारपेठ मोठी आहे. मुंबईत प्रामुख्याने उत्तर प्रदेशमधून पतंग मोठ्या प्रमाणावर येतात. अगदी दोन रुपयांपासून ते ९०० रुपयांपर्यंत पतंगाच्या किमती आहेत. महागड्या पतंग उडवणारेही शौकीन आहेत. नागपाडा, उमरखाडी, मशीद बंदर, कुर्ला, माटुंगा मुलुंड, घाटकोपर, बोरिवली, अंधेरी या भागात प्रामुख्याने पतंगाचे मोठे होलसेल व्यापारी आहेत.
या भागातून मुंबईतील अनेक ठिकाणच्या किरकोळ विक्रेत्यांना पुरवठा होतो. रामपूर पतंग, प्लास्टिक कापडाचे पतंग, कापडाचे पतंग असे विविध प्रकारचे पतंग बाजरात येतात. त्यांची किंमत २ रुपयांपासून ९०० रुपयांपर्यंत असते. होलसेल विक्रेते कुडीच्या प्रमाणात विक्री करतात. ३० रुपयाच्या एका कुडीत २० पतंग असतात. ४० रुपयाच्या कुडीत ५० ते ६० पतंग असतात.
चायना पतंग :
चायना मेड पतंग साधारण ६ ते सात फुटाचे असतात. १२० रुपयांपासून ६०० रुपयांना एक पतंग मिळतो. अशा प्रकारचे पतंग भारतात बनवले तर एक पतंग बनवण्याचा आणि विक्री असे मिळून ५०० रुपये खर्च येतो.
धारवाला मांजा:
मांजा किती तारी आहे यावर त्याची धार ठरते. ज्याच्या मांज्याची धार जास्त, काटाकाटीत त्याचे पारडे जड असते. ९ तारी, १२ तारी, १६ तारी असे मांजाचे प्रकार असतात. १५० रुपयांपासून ३५० रुपयांपर्यंत (मांजाचा एक रीळ) मांजा मिळतो. फिरक्या १० रुपयांपासून १५० रुपयांपर्यंत मिळतात.
काेठुन येतात पतंग?
पतंग मोठ्या प्रमाणावर उत्तर प्रदेशातील रामपूर, बरेली, मुरादाबाद, आग्रा, तसेच गुजरातच्या अहमदाबाद आणि सुरत येथून येतात.
मोदी, राहुल, शाहरुख आणि सलमान :
पतंगावर नेते, अभिनेत्यांची छबी छापण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी, प्रियांका गांधी या राजकीय नेत्यांसोबत शाहरुख खान, सलमान खान यांची छबी असलेल्या पतंगांना चांगली मागणी आहे, असे डोंगरातील होलसेल व्यापारी मोहम्मद मलिक अन्सारी यांनी सांगितले.