मुंबई - विधानसभा निवडणुकीला २ महिने शिल्लक असताना महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील जागावाटप अद्याप निश्चित नाही. त्यात इच्छुकांनी नेत्यांच्या गाठीभेटी घेणं सुरू केले आहे. अलीकडच्या काळात नेत्यांची पक्षांतरे वाढली आहेत. यातच आज काँग्रेस आमदार अमीन पटेल यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर हजेरी लावल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या.
या भेटीनंतर आमदार अमीन पटेल म्हणाले की, आज देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्यामागं २ कारणं आहेत. एक म्हणजे गणपतीनिमित्त मी सदिच्छा भेट घेतली तर दुसरं आज ईद ए मिलाद आहे. त्यासाठी परवा जुलूस निघणार आहे त्याच्यासाठी विशेष पोलीस आयुक्त देवेन भारतीही इथे आहेत. त्यांच्यासोबत उद्या गणपती मिरवणुकीनंतर परवाच्या कार्यक्रमाला पोलिसांनी सहकार्य करावे यासाठी इथं आलो असं त्यांनी सांगितले.
अमीन पटेल यांच्या सागर बंगल्यातील भेटीवेळी अजित पवारही तिथे दाखल झाले, त्यावरून तुम्ही महायुतीत जाणार का असा सवाल अमीन पटेल यांना पत्रकारांनी विचारला. त्यावेळी मी काँग्रेसमध्ये काल होतो, आज आहे आणि उद्याही राहील. मी जन्मापासून काँग्रेसी आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात मी काम करतोय आणि यापुढे करणार असा खुलासा आमदार अमीन पटेल यांनी दिला.
दरम्यान, मी उपमुख्यमंत्र्यांना २ कारणांसाठी भेटायला आलो. ते मी तुम्हाला सांगितले. मी काँग्रेस पक्षातूनच लढणार आहे. काँग्रेस आजही निवडणुकीसाठी तयार आहे. महाविकास आघाडीची पूर्ण तयारी आहे. निवडणुकीला सामोरे जायला महाविकास आघाडी सक्षम आहे असं सांगत अमीन पटेल यांनी ईद, दिवाळी, होळी ही आपली संस्कृती आहे. सगळे सण आम्ही मिळून एकत्रित साजरे करू असा विश्वास व्यक्त केला.
काँग्रेसच्या 'या' २ आमदारांची पक्षातून हकालपट्टी
नुकतेच काँग्रेसनं त्यांच्या पक्षातील २ आमदारांवर मोठी कारवाई करत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. जितेश अंतापूरकर आणि झिशान सिद्दीकी यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दिली होती. विधान परिषदेत काँग्रेसच्या काही आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले होते. त्यात महायुतीला फायदा झाला होता. यावेळी पटोलेंनी ज्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले त्यांची नावे आम्हाला माहिती झाली आहे. हायकमांडकडे या नावांची यादी पोहचली असून त्यांच्यावर पक्ष कारवाई करेल असा इशारा दिला होता.