Join us  

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ‘मरे’चे रडगाणे, प्रवाशांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल आम्ही...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2023 6:31 AM

रविवार आणि नवीन वर्ष असतानाही मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला. त्यामुळे   मुंबईकरांचे मेगाहाल झाले.

मुंबई : प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवर येणारी गाडी १५ मिनिटे उशिराने धावत आहे. प्रवाशांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत... दर रविवारी हमखास होणारी ही उद्घोषणा नववर्षाच्या पहिल्याच दिवशी कानावर पडल्याने फिरण्यासाठी घराबाहेर पडलेल्या अनेक प्रवाशांचा हिरमोड झाला. रविवारच्या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना मन:स्ताप सहन करावा लागला. 

रविवार आणि नवीन वर्ष असतानाही मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला. त्यामुळे   मुंबईकरांचे मेगाहाल झाले. विशेष म्हणजे रविवार वेळापत्रकामुळे निम्म्या लोकल फेऱ्या रद्द करण्यात येतात. त्यामुळे देवदर्शनाला बाहेर पडलेल्या नागरिकांना लोकल आणि फलाटावर गर्दीचा सामना करावा लागला. शनिवारी रात्रीही उशिराने मध्य रेल्वेवरील लोकल विलंबाने धावत होत्या. मध्य रेल्वेच्या कारभारावर प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.

ब्लॉकमुळे लोकल फेऱ्या सुमारे २५ ते ३० मिनिटे उशिराने धावत होत्या. तर हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी स्थानकांदरम्यान ब्लॉकची कामे हाती घेण्यात आली होती. यामुळे अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या. यामुळे हार्बर मार्गावरील प्रवाशांनी पर्यायी मार्गाने प्रवास करण्याला पसंती दिली. 

प्रवाशांचे प्रचंड हालमेगाब्लॉक संपल्यानंतरही मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल फेऱ्यांमध्ये गर्दी असल्याने नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी रेल्वे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. विशेष म्हणजे दादर, कुर्ला, आणि ठाणे या रेल्वेस्थानकात मोठ्या प्रमाणात गर्दी उसळून आली होती.

सीएसएमटी रेल्वेस्थानकात चित्रपटाचे चित्रीकरणएकीकडे मध्य रेल्वेच्या मेगाब्लॉकमुळे प्रचंड हाल झाले, तर दुसरीकडे रेल्वेस्थानकावर गर्दी असतानासुद्धा सीएसएमटी रेल्वेस्थानकात चित्रपटाचे चित्रीकरण ठेवून प्रवाशांची कोंडी करण्यात आली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेचा कारभारावर रेल्वे मंत्र्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवाशांनी केली.

टॅग्स :लोकलमुंबई