मुंबई :
सायबर अधिकारी असल्याचे सांगत एका २७ वर्षीय तरुणीला लाख रुपयांचा गंडा घातला. तसेच व्हिडीओ कॉलवर निर्वस्त्र होण्याची मागणी केली. ही धक्कादायक घटना सांताक्रृझमध्ये घडली. याविरोधात तरुणीने वाकोला पोलिसात तक्रार दाखल केली असून, दोघांवर माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (सी), ६६(ड) तसेच बीएनएस कायद्याचे कलम ३१८(४), ३१९(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
६ ऑक्टोबर रोजी तक्रारदार तरुणी घरी असताना सकाळी अनोळखी मोबाइलवरून फोन आला. समोरच्या कॉलरने तो डीएचएल लॉजिस्टिक दिल्ली ब्रॅंचमधून अविरॉय शुक्ला बोलत आहे, असे सांगितले. तुमचे पार्सल आहे. ज्यामध्ये तीन क्रेडिट कार्ड, चार किलो कपडे, एक लॅपटॉप, ड्रग्ज सापडले आहेत. या बेकायदेशीर बाबीसह तुमचे आधार आणि मोबाइल क्रमांक याच्याशी लिंक आहे. यासाठी तुम्हाला दिल्ली सायबर सेलमध्ये जावे लागेल, असे सांगितले.
दरम्यान, त्याने अन्य एका व्यक्तीला कॉल कनेक्ट केला जो स्वतःला दिल्ली सायबर क्राइमचा अधिकारी असल्याचे भासवत होता. त्याने तरुणीला स्काइप ॲप डाऊनलोड करण्यास भाग पाडले आणि तुमच्यावर सुप्रीम कोर्टमध्ये ह्यूमन ट्राफिकिंग व मनी लॉन्ड्रिंगचा आरोप आहे. तुमचे बँक अकाउंट स्टेटमेंट पाठवा, असे सांगितले.
अटक होईल, पैसे परत मिळणार नाहीतघाबरलेल्या तरुणीने स्वतःच्या खात्यातील १ लाख रुपये भामट्यांच्या अकाउंटवर पाठवले. या बदल्यात त्यांना क्लीअरन्स सर्टिफिकेट पाठवत अजून पैशांची मागणी केली. त्यानंतर तुमच्या अंगावर टॅटू आहेत का हे तपासण्यासाठी कपडे काढण्यास सांगितले. तसे न केल्यास तुम्हाला अटक होईल, पैसेही मिळणार नाहीत, असेही सांगितले. एफआयआरमध्ये नमूद केले आहे.