Join us

"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2024 2:25 PM

मतदानाच्या दिवशी घडलेल्या हालचालींबाबत संशय व्यक्त करत आदित्य ठाकरेंचा निवडणूक आयोगावरही आरोप

Aditya Thackeray, Ravindra Waikar: नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे रविंद्र वायकर यांचा अवघ्या ४८ मतांनी विजय झाला. त्यांनी ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांचा पराभव केला. पण या निकालात काहीतरी गौडबंगाल असल्याचा आरोप निकालाच्या दिवसापासूनच ठाकरे गटाकडून केला जात आहे. तशातच ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर यांनी मतमोजणी केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज देण्याची मागणी केली होती. ते फुटेज देण्यासही मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी नकार दिला. तसेच, वायकर यांचा नातेवाईक मंगेश पंडीलकर ईव्हीएमशी जोडलेला मोबाइल फोन वापरत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या साऱ्यावर आता ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले आहे.

"एकदा जो गद्दारी करतो, तो कायमचा गद्दार असतो. मिंधे गटाच्या उत्तर पश्चिमच्या उमेदवाराने लोकशाहीसोबत विश्वासघात केला आहे. निवडणूक आयोग सीसीटीव्ह फुटेज देत नाही, यातून आयोगाचा सुद्धा यात सहभाग असल्याचे दिसून येते. चंडीगड प्रकरणात झालेल्या प्रकारात त्यांची प्रतिमा मलीन झाली होती, तसं पुन्हा घडू नये म्हणून निवडणूक आयोगाकडून ही दृश्ये दिली जात नाहीयेत. भाजपा आणि मिंधे गटाला लोकशाही संपवायची आहे आणि संविधानही बदलायचे आहे", असे ट्विट करत आदित्य ठाकरे यांनी आपले मत मांडले.

दरम्यान, निकालाच्या चार दिवसानंतर निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या सूचनेनुसार मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांना सीसीटीव्ही फुटेज मिळण्यासंदर्भात अमोल कीर्तिकर यांनी पत्र दिले होते. कीर्तिकरांनी मतमोजणी केंद्रामध्ये गोंधळ झाल्याचे सांगत ४ जून रोजीचे दुपारी चार ते रात्री आठच्या दरम्यान मतमोजणी केंद्रावर जे काही घडलं त्याचे सीसीटीव्ही फुटेज मागितले. यावर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी अमोल कीर्तिकर यांनी दिलेल्या विनंती पत्रानंतर मतमोजणी केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार दिला. त्यामुळे आता या मुद्द्यावरून अमोल कीर्तिकर कोर्टाचे दार ठोठवण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :आदित्य ठाकरेरवींद्र वायकरअमोल कीर्तिकरमुंबईभारतीय निवडणूक आयोग