माटुंगाजवळ पुन्हा एकदा बेस्टची बस पेटली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2019 02:42 AM2019-08-01T02:42:51+5:302019-08-01T02:43:10+5:30
वरळी बस आगाराची २७ क्रमांकाची बस मुलुंडहून वरळीला जात असताना संध्याकाळी ४.१७ वाजता ही दुर्घटना घडली
मुंबई : महापालिकेकडून आर्थिक मदत आणि प्रवासी संख्येत वाढ होत असताना बेस्ट प्रशासनासमोर नवीन संकटे उभी राहत आहेत. बेस्ट उपक्रमाच्या बसने बुधवारी संध्याकाळी माटुंगा, माहेश्वरी उद्यान सर्कल येथे पेट घेतला. या बसमधून प्रवास करणारे तीन प्रवासी आणि बस चालक व वाहक यांनी तत्काळ बसबाहेर धाव घेतल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मे महिन्यात गोरेगाव येथे बेस्टच्या सीएनजी बसगाडीने पेट घेतला होता.
वरळी बस आगाराची २७ क्रमांकाची बस मुलुंडहून वरळीला जात असताना संध्याकाळी ४.१७ वाजता ही दुर्घटना घडली. माटुंगा येथील माहेश्वरी उद्यानाजवळ ही बस पोहोचली असता चालकाला केबिनमधील इलेक्ट्रॉनिक बोर्डमधून धूर येत असल्याचे दिसून आले. त्यानंतर लगेचच गाडीने पेट घेतला. चालकाने तत्काळ बस बाजूला घेऊन प्रवाशांना खाली उतरवले. यामुळे मोठी दुर्घटना टळली. अग्निशमन दलाला वेळीच पाचारण करण्यात आले. आगीचे बंब घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आग विझविण्यात आली.
बसला आग चिंतेचा विषय!
बेस्ट उपक्रमाला नवीन बस गाड्या खरेदी करण्यासाठी महापालिकेने आर्थिक मदत केली होती. त्यानुसार नवीन बस ताफ्यात दाखल होत असताना सीएनजी बसगाड्यांमध्ये लागणारी आग बेस्टसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. गोरेगाव पूर्व येथील बसगाडीला ३ मे रोजी आग लागली होती.
या घटनेच्या चौकशीनंतर सीएनजी बसगाडीबाबत तक्रार आल्यास एकही बसगाडी आगाराबाहेर काढणार नाही, असे बेस्ट प्रशासनाने स्पष्ट केले होते. मात्र तीन महिन्यांतच बेस्ट उपक्रमाच्या आणखी एका बसगाडीमध्ये आग लागण्याची घटना घडली आहे.