Join us

पुन्हा एकदा खासगी डॉक्टरांचा टेलीमेडिसिनवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 4:06 AM

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा एकदा रुग्णालयांमधील बाह्य रुग्ण विभागातील गर्दी ओसरली आहे, शिवाय बरेच रुग्ण कोरोना संसर्गाच्या ...

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा एकदा रुग्णालयांमधील बाह्य रुग्ण विभागातील गर्दी ओसरली आहे, शिवाय बरेच रुग्ण कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे रुग्णालयाकडे पाठ फिरवत आहे. अशा स्थितीत आता खासगी डॉक्टरांनी पुढाकार घेऊन टेलीमेडिसिनवर भर देण्याचे ठरविले आहे. टेलीमेडिसिन सेवा उपलब्ध झाल्याने कोविडचा प्रसार रोखण्यात आणि त्याचबरोबर कोविड व्यतिरिक्त व अत्यावश्यक सेवा सुरू राखण्यासाठी मदत होत आहे.

डिजिटल हेल्थ क्षेत्राचा विस्तार हा मोठा असून, यात टेलीकेअर, टेलीहेल्थेकेअर आणि व्हिडीओ सल्ला-मसलत असे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. टेलीकेअरमध्ये रुग्ण त्याच्या घरातच असतो, पण त्याला डॉक्टरांचा तातडीच्या प्रसंगी सल्ला फोनवर दिला जातो. अशा रुग्णाला त्याच्या औषधांची आठवण करून देणे, त्याच्या औषधे घेण्यावर नजर ठेवणे, घरात एकटा असताना तो पडला, मार लागला किंवा कोणत्याही कारणाने बेशुद्ध पडला, तर त्याच्या जवळच्या रुग्णालयात कळवून त्याला रुग्णवाहिका पाठविणे अशी अनेक कामे केली जातात.

टेलीहेल्थकेअर तंत्रज्ञानामुळे रुग्णाच्या वैद्यकीय स्थितीमध्ये होणारे दैनंदिन बदल, उदा.त्याचा रक्तदाब वाढला, तर त्याच्या या त्रासाची दूर अंतरावर असलेल्या वैद्यकीय तज्ज्ञांकडून दूरस्थ तपासणी करून त्याच्या परिस्थितीचे परिशीलन करून त्याचे दूरस्थ निदान केले जाते. त्यात गरजेनुसार काही औषधे बदलणे किंवा पूर्ण उपचार बदलाने याबाबत निर्णय घेतला जातो. व्हिडीओ सल्लामसलत या पर्यायात डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंग करून केलेल्या सल्लामसलतीत रुग्ण डॉक्टरांशी थेट संवाद साधू शकतो आणि त्याच्या तब्येतीबाबत चर्चा करू शकतो. त्याच्या आजाराबाबत वैद्यकीय माहिती आणि औषधोपचार घेत आहेत.

आरोग्य क्षेत्रात डिजिटलायझेशन महत्त्वाचे

डॉ. नीलेश सोनावणे, हृदयविकार तज्ज्ञ

डिजिटल तंत्रामुळे त्याला हव्या त्या डॉक्टरांची घरबसल्या ‘अपॉइंटमेंट’ घेता येते, या सर्व सुविधांचा फायदा रुग्णालाच होतो. घरी राहून साध्या किंवा गंभीर आजारांबाबत सल्ला घेता येतो. तातडीच्या उपचारांसाठी घरी रुग्णवाहिका येऊन रुग्णाला वेळप्रसंगी हॉस्पिटलमध्ये दाखल करता येते. टेलीफार्मसीद्वारे घरबसल्या औषधे मिळतात, ती कशी घ्यायची, याबाबत सल्ला ही मिळतो. त्याची आठवणही करून दिली जाते.