लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर गाड्या आणि स्थानकांसाठी योग्य वीजपुरवठा होईल याची खात्री करण्यासाठी पीएसटी मेंटेनन्स टीम ही एमएमओपीएल येथे प्रशिक्षण घेत आहे, अशी माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दिली.
आगामी मेट्रो चाचणीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर सर्व कामे सुरळीत होण्याच्या दृष्टीने टीम विविध प्रशिक्षणे घेत आहे. यात नवीन रेल-रोड मूव्हरशी संबंधित प्रशिक्षण समाविष्ट आहे. जे चारकोप मेट्रो आगारात रेल्वेचे शंटिंग ऑपरेशन करणार आहे.
आजघडीला मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ ची कामे वेगाने सुरू आहेत. या दोन्ही मेट्रो येत्या काही महिन्यात रुळावर येतील, असा दावा केला जातो आहे. बहुतांश कामे पूर्ण होत असून, येत्या काही दिवसांत मेट्रोदेखील मुंबईत दाखल होईल, असेही प्राधिकरणाकडून सांगण्यात येत आहे.
अद्याप तारीख जाहीर झाली नसली तरी सुरू असलेल्या कामानुसार मे महिन्यात मेट्रो सुरू होईल. आणि पश्चिम उपनगर व प्रवाशांना दिलासा मिळेल. वाहतूक कोंडी कमी होईल. शिवाय मुंबई इन मिनिट्स हे स्वप्न साकार होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.