थांबला एकदाच; पावसाची विश्रांती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2020 05:49 PM2020-08-07T17:49:11+5:302020-08-07T17:50:15+5:30
तब्बल चार दिवस मुंबईसह उपनगराला झोडपून काढलेल्या पावसाने शुक्रवारी अखेर विश्रांती घेतली.
मुंबई : तब्बल चार दिवस मुंबईसह उपनगराला झोडपून काढलेल्या पावसाने शुक्रवारी अखेर विश्रांती घेतली. शुक्रवारी सकाळपासून मुंबईत पाऊस ब-यापैकी थांबला असला असून, सकाळी ८.३० वाजताच्या नोंदीनुसार मुंबईत ७९.२ मिलीमीटर एवढा पाऊस पडला आहे. तर ८ ऑगस्ट रोजी शहर आणि उपनगरात आकाश सामान्यत: ढगाळ राहील. सोसाटयाचा वारा वाहील. मुसळधार पाऊस पडेल. ९ ऑगस्ट रोजी शहर आणि उपनगरात आकाश सामान्यत: ढगाळ राहील. मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
मुंबईत पाऊस कोसळत असतानाच शहरात २०७, पूर्व उपनगरात १८ आणि पश्चिम उपनगरात ४५ अशा एकूण २७० ठिकाणी झाडे कोसळली. तर शहरात २८, पूर्व उपनगरात २, पश्चिम उपनगरात ४ अशा एकूण ३४ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. शहरात १३, पूर्व उपनगरात ५ आणि पश्चिम उपनगरात ६ अशा एकूण २४ ठिकाणी बांधकामाचा भाग कोसळला. गुरुवारी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास घाटकोपर पूर्व येथे राहुल गल्लीत तळमजला अधिक एक घराचा भाग कोसळला. यात जखमी झालेल्या एका व्यक्तीवर राजावडी रुग्णालयात उपचार करण्यात आले.
केम्प्स कॉर्नर येथे डोंगराचा भाग खचल्याची घटना बुधवारी रात्री घडली होती. या घटनेमुळे येथील पाण्याचे वॉल्व्ह खराब झाले. येथे ५०० मिमी पाईप लाईनचे नवीन काम सुरु आहे. हिल रोड, फोर्जेस स्ट्रीट, राघवजी रोड, डमाडीया कॉलनी, ऑगस्ट क्रांती मैदान, अल्टा माऊंट रोड, सांफिया पारेख लेन, पेडर रोड, एन एफ पारकर रोड येथील पाणी पुरवठा खंडीत झाला. येथे ३८ टँकर्सद्वारे पाण्याचा पुरवठा करण्यात आला.
गेल्या २४ तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र येथे जोरदार पावसाची नोंद झाली. ८ ऑगस्ट रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. महाराष्ट्राच्या किनारी सोसाटयाचा वारा वाहील. ९ ऑगस्ट रोजी कोकण, विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. १० आणि ११ ऑगस्ट रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार आणि मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
------------------
पाऊस मिमी
कुलाबा २५.२
सांताक्रूझ ७९.२
------------------
पाऊस मिमी
शहर ३७.२३
पूर्व उपनगर ६३.२७
पश्चिम उपनगर ५५.९५
------------------
सात तलावातील पाणीसाठा
वर्ष/ दशलक्ष लिटर्स/टक्केवारी
२०२०/६७०८०२/४६.३५
२०१९/१३०२९४३/९०.०२
२०१८/१२२६०३०/८४.७१
------------------