Join us  

'एकेकाळी ते माझे मित्र होते, आता त्यांनी संविधानाचे मित्र व्हावे', आदित्य ठाकरे आशावादी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2023 9:38 AM

उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर पुन्हा मविआचे सरकार स्थापित करता आले असते, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले. त्यामुळे एकनाथ शिंदेंचे सरकार वाचले, असा निकालाचा आशय काढण्यात आला

Maharashtra Political Crisis, Aditya Thackeray vs Eknath Shinde: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाच्या ५ न्यायमूर्तींच्या घटनापीठाने या मुद्द्यावर निकाल वाचन केले. राज्यातील सत्तासंघर्ष सुरू असताना, एकनाथ शिंदेंसह १६ आमदारांच्या अपात्रेचा निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना देण्यात आला. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने अपात्रेची कारवाई वाचवण्यासाठी आम्हीच पक्ष असल्याचा दावा, नव्या व्हिपची नियुक्ती आणि राज्यपालांनी फ्लोअर टेस्टबाबत केलेली कारवाई ही घटनाबाह्य असल्याचे म्हटले. त्यामुळे, सरकारच्या स्थापनेवर अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. त्यामुळे, आता विरोधकांकडून नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा मागण्यात येत आहे. शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी आता विधानसभा अध्यक्षांककडून नि:पक्षपणे निर्णय होईल, असे म्हटले आहे. 

उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर पुन्हा मविआचे सरकार स्थापित करता आले असते, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले. त्यामुळे एकनाथ शिंदेंचे सरकार वाचले, असा निकालाचा आशय काढण्यात आला. त्यावर आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत आपले मत मांडले होते. "असंवैधानिक, बेकायदेशीर, अनैतिक-विशेषत: आजच्या निकालानंतर, मिंधे-भाजप गद्दार सरकारकडे पाहण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. सरकार विरोधी गोष्टींचा ताबा घेण्यामध्ये पूर्वीच्या राज्यपालांची भूमिका आणि मदत दिसून आली. लोकशाही आणि राज्यघटना दडपल्याचे स्पष्ट होते. त्यांनी राज्यपाल म्हणून नव्हे तर पक्षाचा माणूस म्हणून काम केले. जर काही नैतिकता आणि लाज उरली असेल तर असंवैधानिक मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. त्यांचा सत्तेचा लोभ उघड आहे, पण नैतिकता आणि लोकशाही सर्वोच्च असली पाहिजे," असे ट्विट आदित्य यांनी केले होते. त्यानंतर, आता आदित्य यांनी १६ आमदारांच्या अपात्रतेवर भाष्य करताना विधानसभा अध्यक्ष हे माझे पूर्वीचे मित्र होते, असेही म्हटले. 

विधानसभा अध्यक्षांचा रोल खूप महत्त्वाचा असून घटनेनं लिहिलेला, तोच निकाल ते देतील. विधानसभा अध्यक्ष हे कुठल्या पक्षाचे नसतात ते सभागृहाचे अध्यक्ष असतात. सध्या लोकशाहीला आणि संविधानाला धोका आहे. आपल्या देशात लोकशाही राहिली आहे की नाही हा प्रश्न आहे. चाळीस गद्दार अपात्र होणार असून अध्यक्षांनी पक्षपात न करता नि:पक्षपणे काम केलं तर लवकर निकाल दिसेल, असे आदित्य यांनी म्हटले. तर,  एकेकाळी ते माझे मित्र होते (राहुल नार्वेकर यांना उद्देशून)  पण आता त्यांनी संविधानाचे मित्र व्हावे, असे म्हणत विधानसभा अध्यक्षांबद्दल आदित्य ठाकरे आशावादी असल्याचे दिसून आले. 

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायलाच पाहिजे, आजचे कोर्टाचे ताशेरे बघा राजीनामा द्या आणि या निवडणुकीला सामोरे जावा, असे आव्हानही आदित्य यांनी दिले. राज्यातील मोठे मोठे प्रकल्प राज्याच्या बाहेर गेले आणि हे खुर्चीला चिटकून बसले आहेत, असेही ते म्हणाले. दरम्यान, हुकूमशाही पद्धतीने दिल्ली पुढे महाराष्ट्राला झुकवण्याचं काम झालं. जे सरकार विरोधात खंबीरपणे बोलतात त्यांना हैराण केलं जातं, असेही आदित्य यांनी म्हटलं. 

टॅग्स :आदित्य ठाकरेशिवसेनाराहुल नार्वेकरसर्वोच्च न्यायालय