चार वर्षे खंडीत झालेली एकांकिका स्पर्धा पुन्हा सुरू; नाट्य परिषदेच्या एकांकिका स्पर्धेच्या प्रथम फेरीत ‘अ डील’ सर्वोत्कृष्ट
By संजय घावरे | Published: October 11, 2023 07:28 PM2023-10-11T19:28:38+5:302023-10-11T19:28:47+5:30
या स्पर्धेची प्राथमिक फेरी नुकतीच माटुंगा येथील यशवंतराव चव्हाण नाट्य संकुलात पार पडली.
मुंबई - अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबईच्या वतीने आयोजित केली जाणारी शाखांतर्गत एकांकिका स्पर्धा चार वर्षांच्या खंडानंतर पुन्हा सुरू करण्यात आली आहे. या स्पर्धेची प्राथमिक फेरी नुकतीच माटुंगा येथील यशवंतराव चव्हाण नाट्य संकुलात पार पडली. यात नाशिक शाखेच्या 'अ डील' या एकांकिकेने बाजी मारली.
मागील १३ वर्षांपासून नाट्य परिषदेच्या सर्व शाखांमध्ये एकांकिका स्पर्धा भरवण्यात येते. नवनिर्वाचित कार्यकारी समितीच्या प्रयत्नांमुळे हि स्पर्धा पुनरुज्जीवित झाली आहे. या अंतर्गत राज्यभरात विविध ठिकाणी प्राथमिक फेऱ्या संपन्न झाल्या. मुंबईतील प्राथमिक फेरीच्या उदघाटनप्रसंगी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, ज्येष्ठ अभिनेत्री व कार्यकारी समिती सदस्या सविता मालपेकर, कोषाध्यक्ष सतीश लोटके, सहकार्यवाह दिलीप कोरके, बालरंगभूमीचे असिफ अन्सारी, परीक्षक रुपाली मोरे, अनंत जोशी, स्पर्धा प्रमुख शिवाजी शिंदे, दिगंबर आगाशे उपस्थित होते. या स्पर्धेत एकूण ५ एकांकिका सादर झाल्या.
बोरिवली शाखेने 'सुरकुत्या', कल्याणने 'चफी', नाशिकने 'अ डील', मुलुंडने 'नमस्कारासन' तर मुंबई मध्यवर्तीने 'द स्टोरी ऑफ हिस् वर्ल्ड' या एकांकिका सादर केल्या. या प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीसाठी नाशिक शाखेची ‘अ डील’, तर मध्यवर्तीची ‘द स्टोरी ऑफ हिस वर्ल्ड’ ही एकांकिका उत्कृष्ट ठरली. आनंद जाधव यांना दिग्दर्शनाकरिता सर्वोत्कृष्ट, तर सागर सातपुते यांना उत्कृष्ट पारितोषिक देण्यात आले. पूजा पुरकर, मानसी जाधव, हेमाली साळवे, स्नेहल काळे, करुणा कातखडे, विश्वंभर परेवाल, संकेत खंडागळे, कुणाल गायकवाड, नंदकिशोर भिंगारदिवे यांना अभिनयाची प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.