Join us  

ट्रॉलीच्या खाली लपवले दीड कोटींचे सोने; तीन प्रवाशांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2023 8:49 AM

विमानतळावरून तीन प्रवाशांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : परदेशातून सोबत आणलेली तीन किलो वजनाची सोन्याची बिस्किटे लपवायची कशी, कस्टम अधिकाऱ्यांना चकवा कसा द्यायचा, यावर तोडगा काढण्याचा तीन भारतीय प्रवाशांचा प्रयत्न फसला आणि आता त्यांना कोठडीची हवा खावी लागत आहे.  २४ कॅरेटच्या या सोन्याचे वजन तीन किलो असून, त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत १ कोटी ६० लाख रुपये इतकी आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परदेशातून मुंबई विमानतळावर दाखल झालेल्या या तीन भारतीय प्रवाशांकडे एकेक किलो वजनाची अशी तीन सोन्याची बिस्किटे होती. विमानतळावर त्यांनी आपले सामान घेतल्यानंतर ते ठेवण्यासाठी ट्रॉली घेतली आणि त्या ट्रॉलीच्या खालील बाजूस ही सोन्याची बिस्किटे चिकटवून लपवली. मात्र, ही बाब कस्टम अधिकाऱ्यांच्या लक्षात आली आणि त्यांनी त्यांना बाजूला घेत सामानाऐवजी थेट त्या ट्रॉलीची तपासणी केली. ट्रॉलीच्या तळाला एका बॉक्समध्ये सोने लपविल्याचे आढळून आले. या प्रवाशांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, मार्च महिन्यांत दोन घटनांत मुंबई विमानतळावरील कस्टम विभागाने ५ कोटी रुपये मूल्याची एकूण ११ किलो सोन्याची तस्करी पकडली आहे. 

टॅग्स :सोनंविमानतळ