Join us  

खजिन्याच्या लोभापायी गमावले दीड कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 1:58 PM

सात जणांविरोधात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोलकाता येथे एका जमिनीमध्ये हजारो कोटी रुपये मूल्याचा खजिना सापडला आहे. त्यात तुम्हाला लाभार्थी बनवून कोट्यवधी रुपयांचा फायदा करून देतो, असे आमिष दाखवत एका व्यावसायिकाला दीड कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी सातजणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. 

भुलेश्वर परिसरात राहणारे कमल जाजू (५८) यांना नौशाद शेख याने १ ऑक्टोबरला संपर्क साधून कोलकात्यातील कथित खजिन्याची माहिती दिली. शांतिलाल पात्रा यांच्या जमिनीत हा खजिना सापडल्याची बतावणी त्याने केली. तसेच जाजू यांना त्यातून कोट्यवधी रुपयांचा लाभ मिळवून देण्याचे आमिषही नौशादने दाखविले. पैशांच्या आमिषाला भुलून जाजू यांनी दि. १ ऑक्टोबरपासून दि. २२ नोव्हेंबर या कालावधीत चार लाख ६० हजार रुपये, ७६ लाख ६५ हजार रुपये, ६८ लाख १० हजार रुपये अशी रक्कम स्वतःच्या, पत्नीच्या व एका नातेवाईकाच्या खात्यातून पाठवले. 

  त्यानंतर डिमांड ड्राफ्टद्वारेही सहा लाख सहा हजार रुपये पाठवले. एकूण दीड कोटी रुपये जाजू यांनी नौशादला पाठवले.   जाजूंचा विश्वास संपादन व्हावा म्हणून नौशादनेही १२ लाख १० हजार रुपये त्यांच्या खात्यावर इंजेक्शनच्या नावाखाली पाठवले. त्यानंतर नौशादने पैशांची मागणी सुरूच ठेवली. \  परंतु जाजू यांनी पैसे देणे टाळले. दिलेले पैसे परत देण्याचा तगादा जाजू यांनी नौशादकडे लावला असतो तो संपर्कक्षेत्राच्या बाहेर गेला.   अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर जाजू यांनी याप्रकरणी एल.टी. मार्ग पोलिसांकडे तक्रार केली. या संपूर्ण गैरव्यवहार आरोपी नौषादला आणखी सहा व्यक्तींनी मदत केल्याचा आरोप आहे.

टॅग्स :गुन्हेगारीमुंबई