चार महिन्यांत चोरले दीड कोटींचे सोने, इंजिनिअरसह चौघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2023 06:46 AM2023-02-18T06:46:53+5:302023-02-18T06:47:19+5:30
कास्टिंग इंजिनिअरसह चौघांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : चार महिन्यांत दीड कोटी रुपये किमतीचे सोने, चांदी आणि प्लॅटीनमची चोरी करण्याचा प्रकार दागिन्यांच्या कारखान्यात उघडकीस आला. याप्रकरणी गोरेगाव येथील वनराई पोलिसांनी कास्टिंग इंजिनिअरसह चौघांना अटक केली आहे.
वनराई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कामा ज्वेलर्स या फॅक्टरीमध्ये हा प्रकार घडला. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या वजनात तफावत येत असल्याचे फॅक्टरी मॅनेजरच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तत्काळ याप्रकरणी वनराई पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार परिमंडळ १२ च्या पोलिस उपायुक्त स्मिता पाटील यांनी गुन्हे प्रकटीकरण कक्षाच्या दोन पथकांना तपास करण्याचे आदेश दिले. त्यानुसार तपास अधिकारी पोलिस निरीक्षक (गुन्हे) राणी पुरी, संजय चौधरी, सहायक पोलिस निरीक्षक प्रथमेश विचारे, उपनिरीक्षक शिंदे, हवालदार निसार पालवे, मोरे, पाटील, लोणी या सर्व तपास अधिकाऱ्यांनी मिळून अवघ्या २४ तासांतच चारही आरोपींना मुंबईच्या वेगवेगळ्या भागातून ताब्यात घेतले. सुरक्षारक्षकाच्या मदतीने कारखान्यातून चार महिन्यांपासून तब्बल १ किलो ७०० ग्रॅमपेक्षा अधिक सोने, प्लॅटीनम आणि चांदीची बिस्कीट त्यांनी लंपास केली. सुरक्षारक्षकाच्या चौकशीत ही बाब उघड झाली. यानंतर पोलिसांनी वांद्रे, नालासोपारा, जोगेश्वरी आणि नायगाव परिसरातून मेहुल ठाकूर (२६) निकेश मिश्रा (३३) अविनाश बहादूर (२७) हरिप्रसाद तिवारी (२७) यांना अटक केली. यातील ठाकूर हा कास्टिंग इंजिनिअर तर तिवारी हा सुरक्षारक्षक होता.