बँक खाते सुरक्षित करण्याच्या नावाखाली दीड कोटी हडपले! सायबर पोलिसांनी केला पर्दाफाश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2024 09:49 AM2024-03-16T09:49:43+5:302024-03-16T09:50:58+5:30
पश्चिम बंगालमधील टोळीतील सात जणांना ठोकल्या बेड्या, परदेशी नागरिकही लक्ष्य
मुंबई : क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि बँक खात्यात सायबर फसवणूक झाली असून, खाते सुरक्षित करण्याच्या नावाखाली बँक खात्याची माहिती मिळवायची आणि पुढे याच माहितीच्या आधारे ऑनलाइन खरेदी करून त्या वस्तूंची विक्री करणाऱ्या टोळीचा दक्षिण विभाग सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला. या कारवाईत सात जणांना पश्चिम बंगाल येथून अटक करण्यात आली आहे. ही टोळी परदेशी नागरिकांनाही लक्ष्य करत होती.
चर्चगेट परिसरात राहणाऱ्या तक्रारदाराची मुलगी लंडनमध्ये राहते. २९ फेब्रुवारी ते ३ मार्चदरम्यान अज्ञात व्यक्तीने तक्रारदार व त्यांच्या कुटुंबीयांचे बँक खाते, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डची माहिती मिळवली. तक्रारदार, त्यांची पत्नी आणि परदेशात राहणाऱ्या मुलीच्या बचत खात्यामधून पैसे क्रेडिट कार्डमध्ये वळवले. पुढे क्रेडिट कार्डद्वारे, फ्लिपकार्ट, मिंत्रा, स्विगीसह वेगवेगळ्या ऑनलाइन पोर्टलचा वापर करून एक कोटी ४८ लाख ५६ हजार रुपयांची खरेदी केली.
उच्चशिक्षित ठग -
गणितातून पदवी घेतलेला रयान हा एका बँकेच्या क्रेडिट कार्ड संबंधित कॉल सेंटरमध्ये नोकरीला होता. येथेच काम करत असताना त्याला अशा प्रकारे फसवणुकीची कल्पना सुचली. त्याने कोलकाता येथे स्वत:चे कॉल सेंटर थाटून परदेशी नागरिकांना टार्गेट करण्यास सुरुवात केल्याचे समोर आले.
विविध ठिकाणी वस्तूंची विक्री-
दक्षिण विभाग सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांच्या नेतृत्वात या प्रकरणाचा पथकाने तपास सुरू केला. गुन्ह्यातील आरोपीने क्रेडिटद्वारे मागवलेल्या वस्तू कोलकाता येथे विविध ठिकाणी विक्री केल्याचे निष्पन्न होताच, पोलिस पथक कोलकाता येथे रवाना झाले. याठिकाणी पोलिस आल्याचे कळताच आरोपी सिलीगुडी येथे पळून गेले होते. पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने सिलिगुडी येथून मुख्य आरोपी रयान कालौल शाहदास (२२) याच्यासह सात जणांना ताब्यात घेतले.
अटक आरोपी...
रयान कालौल शाहदास (२२), अरुणभा अमिताभौ हल्डर (२२), रितम अनिमेश मंडल (२३), तमोजीत शेखर सरकार (२२), रजिब सुखचांद शेख (२४),सुजोय जयंतो नासकर (२३) आणि रोहित बरून बैदय (२३) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून ते कोलकाता येथे राहणारे आहे. यापैकी काहीजण उच्चशिक्षित तर काही १२ वी पास आहेत.
...अशी करत होते फसवणूक
बँक खात्यात सायबर फसवणूक झाल्याचे सांगून बँकेच्या ‘ॲक्शन फ्रॉड टीम’मधून बोलत असल्याचे सांगायचे. खाते सुरक्षित करण्यासाठी डेबिट, क्रेडिट कार्डचा तपशील मिळवायचा. आरोपीच्या इंग्रजीतील उत्तम संभाषणामुळे त्याच्यावर कुणाला संशय येत नव्हता. सावज जाळ्यात येताच मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी ऑनलाइन खरेदी करत होते. नंतर त्या वस्तू विकून पैसे मिळवत होते.
ती डिलिव्हरी थांबविली...
आरोपींकडून ५० लाखांची रोख रक्कम, २७ मोबाइल फोन, ५ घड्याळे, ३ एअर बर्ड, १ मॅकबुक, १ आयपॅड, ११ परफ्यूम बाटल्या, २ लेडिज बॅग, २ फ्रीज, २ एअर कंडिशनर, २ प्रिंटर, १ किचन चिमणी जप्त केली आहे. तक्रारदार यांची फसवणूक झालेल्या ६० लाख रुपये किमतीच्या वस्तूंची ऑनलाइन पोर्टलद्वारे डिलीव्हरी केली होती. अन्य मालाची डिलीव्हरी तात्काळ तक्रार केल्याने थांबविण्यात आलेली आहे.
वैयक्तिक माहिती शेअर करू नका...
आपली वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नये व आपली ऑनलाइन फसवणूक झाल्यास तत्काळ १९३० या क्रमांकावर तक्रार करावी, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.