दीड दिवसाचा बाप्पा ‘ऑन डिमांड’ भक्तांचा इकोफ्रेंडली गणेशोत्सवाकडे कल, धावपळीचे जीवन

By सीमा महांगडे | Published: September 13, 2023 01:27 PM2023-09-13T13:27:46+5:302023-09-13T13:28:16+5:30

Ganesh Mahotsav: मुंबईत सध्या धावपळ, गडबड सुरू आहे ती गणेशोत्सवाची आणि त्यासाठीच्या खरेदीची...याच मुंबईकरांच्या व्यस्त जीवनशैलीमुळे हल्ली दीड दिवसांच्या गणपती स्थापनेला अधिकाधिक पसंती दिली जात आहे.

One-and-a-half-day Bappa 'on demand' devotees tend towards eco-friendly Ganeshotsav, hectic life | दीड दिवसाचा बाप्पा ‘ऑन डिमांड’ भक्तांचा इकोफ्रेंडली गणेशोत्सवाकडे कल, धावपळीचे जीवन

दीड दिवसाचा बाप्पा ‘ऑन डिमांड’ भक्तांचा इकोफ्रेंडली गणेशोत्सवाकडे कल, धावपळीचे जीवन

googlenewsNext

- सीमा महांगडे
मुंबईमुंबईत सध्या धावपळ, गडबड सुरू आहे ती गणेशोत्सवाची आणि त्यासाठीच्या खरेदीची...याच मुंबईकरांच्या व्यस्त जीवनशैलीमुळे हल्ली दीड दिवसांच्या गणपती स्थापनेला अधिकाधिक पसंती दिली जात आहे. त्यामुळे मूळ शास्त्राप्रमाणे दीड दिवसांतच गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आणि मूर्तीचे विसर्जन योग्य असून गणेश पूजनाचा उद्देश यातून सफल होत असल्याची माहिती ज्येष्ठ पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली.

गणेशोत्सव हा सामाजिक उत्सव असला तरी तो किती दिवस आणि कुठल्या पद्धतीने यावर कोणतेही बंधन नाही. या पार्श्वभूमीवर शास्त्राप्रमाणे गणेशोत्सव मातीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून गणपतीचे विसर्जन त्याचदिवशी न करता तो किमान दीड दिवस तरी ठेवावा, अशी पद्धत सुरू झाली. पुढे दीडवरून पाच, सात असे करत अनंत चतुर्दशीपर्यंत गणपती बसविण्याची पद्धत सुरू झाली. मात्र कोविड काळात दीड दिवसांच्या गणपतीकडे ओघ वाढला.

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला हातभार 
दरम्यान, दीड दिवसांच्या गणेशोत्सव पद्धतीमध्ये अनेकजण शाडूच्या मातीच्या गणेशमूर्तींना पसंती देतात आणि जवळच्या परिसरातील कृत्रिम तलावांत किंवा घरीच या मूर्तींचे विसर्जन करत असल्याची माहिती अनेक मूर्तिकार देतात. कृत्रिम तलावांतील विसर्जनात दीड दिवसांच्या गणपतींची संख्या जास्त असते त्यामुळे साहजिकच पर्यावरण पूरक विसर्जनाला यामुळे हातभार लागत असल्याची माहिती पालिका अधिकारी देत आहेत.

विभक्त कुटुंब पद्धती
पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धतीमुळे होणारा खर्च, मदतीला असलेले हात या कारणांमुळे शास्त्रोक्त पद्धतीने गणेशोत्सव पार पाडण्यात मदत होत होती. दरम्यान, बदलत्या जीवनशैली आणि विभक्त कुटुंब पद्धतीमुळे दीड दिवसांच्या गणपतीकडे वाढणारा कल साहजिकच असल्याचे मत सोमण व्यक्त करतात. 

वाढती महागाई आणि खर्च 
कोविड काळात अनेकाना आर्थिक अडचणी व समस्यांचा सामना करावा लागला. मात्र परंपरा आणि चालीरीती चालू ठेवण्यासाठी अनेकांनी दीड दिवसांच्या गणपती मूर्ती प्रतिष्ठापनेचा मार्ग स्वीकारला आणि त्यात काही गैर नसल्याचे अभ्यासक स्पष्ट करतात. कालानुरूप पूजा, थाटमाट, सजावट अगदी येणाऱ्या जाणाऱ्यांचा पाहुणचार खर्चिक झाले आहे. 

२०२१ मध्ये नैसर्गिक स्रोतांमध्ये विसर्जित  गणेशमूर्ती
घरगुती  १,५०,२०२  
सार्वजनिक  ८,०२७ 
गौरी मूर्ती - ६५३२ 

२०२१ मध्ये कृत्रिम तलावांत विसर्जित 
गणेशमूर्ती 
घरगुती ७२३८
सार्वजनिक३५०२  
गौरी मूर्ती ३२३१ 

Web Title: One-and-a-half-day Bappa 'on demand' devotees tend towards eco-friendly Ganeshotsav, hectic life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.