Join us

दीड वर्षाच्या अवयवदात्याने वाचविले मुलाचे प्राण; दुर्मिळ आनुवंशिक आजार झालेल्या मुलाला जीवनदान  

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2024 1:34 PM

सुरत येथून अवयव मुंबईतील रुग्णालयात आणण्यासाठी पोलिसांच्या साहाय्याने दोन राज्यात ग्रीन कॉरिडॉर करण्यात आले होते.

मुंबई :  मेंदुमृत अवयवदान केव्हाही करता येते. त्याचेच एक उदाहरण म्हणजे सुरत येथील दीड वर्षांचा मुलगा मेंदूमृत झाल्यावर त्याच्या कुटुंबाने अवयवदानासाठी  संमती दिली.  त्याच्या अवयवदानातून मिळालेल्या यकृताचे (लिव्हर) मुंबईतील रुग्णालयात दाखल असणाऱ्या  १४ वर्षीय मुलावर प्रत्यारोपण केल्याने त्याला जीवनदान मिळाले आहे. 

संबंधित पद्धतीने तरुण अवयवदात्याचा अवयव मिळाल्याची महाराष्ट्रातील ही पहिलीच घटना आहे. त्या मुलावर बुधवारी लिव्हर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. नाशिक येथील १४ वर्षीय मुलाला यकृताचा दुर्मिळ आनुवंशिक आजार असल्यामुळे त्याचे कोलेस्ट्रॉल वाढून त्याला हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक येण्याची शक्यता होती. एप्रिल २०२२ मध्ये त्याच्या कुटुंबीयांनी त्याचे नाव यकृत मिळविण्यासाठीच्या प्रतीक्षा यादीवर नोंदविले. सुरत येथील दीड वर्षांचा मुलगा घरात खेळत असताना पडला. 

रुग्णालयात डॉक्टरांनी त्याला मेंदुमृत घोषित केले. त्यानंतर त्याच्या आईवडिलांनी दिलेल्या संमतीने त्याचे अवयव दान करण्यात आले. त्यापैकी लिव्हर हा अवयव मुंबईतील प्रतीक्षा यादीवर असणाऱ्या मुलाला देण्यात आला. या मुलाची लिव्हर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया डॉ. अनुराग श्रीमाल यांनी केली. 

तर शस्त्रक्रियेपूर्वी आणि त्यानंतरची काळजी घेण्याचे काम गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट डॉ. विभोर बोरकर करत आहेत. त्यांनी सांगितले की, योग्यवेळी त्या मुलाला  हा अवयव मिळाल्यामुळे त्याचे संपूर्ण आयुष्य बदलण्यास मदत होणार आहे. कारण त्याला लिव्हरच्या आजारासोबत अन्य आजार होण्याची शक्यता अधिक होती. 

ग्रीन कॉरिडॉर सुरत येथून अवयव मुंबईतील रुग्णालयात आणण्यासाठी पोलिसांच्या साहाय्याने दोन राज्यात ग्रीन कॉरिडॉर करण्यात आले होते. त्यामुळे सुरत ते मुंबईतील रुग्णालय हे २८१ किलोमीटरचे अंतर ४ तास २० मिनिटांत पूर्ण केले. मुंबई पोलिसांनी केलेल्या सहकार्यामुळे दहिसर चेकनाका ते नानावटी रुग्णालय  हे २० किलोमीटरचे अंतर २० मिनिटांत पार केले. 

टॅग्स :अवयव दानहॉस्पिटलडॉक्टर