Join us

झाडे तोडण्याच्या प्रस्तावासाठी वनस्पती तज्ज्ञांनी घेतली दीड कोटीची लाच?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 12:33 AM

शिवसेनेचा आरोप : मेट्रो कारशेडचा वाद पेटला; सेना-काँग्रेस न्यायालयात जाण्याच्या तयारीत

मुंबई : मेट्रो कारशेडसाठी आरे कॉलनीतील झाडे तोडण्याच्या प्रस्तावाला वनस्पती तज्ज्ञांनीही अनुकूलता दाखविली. मात्र, यामध्ये आर्थिक व्यवहार झाला असून, कारशेड उभारणाऱ्या कंपनीने तीन तज्ज्ञांना एकूण दीड कोटी रुपये दिले असल्याचा गंभीर आरोप स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी शुक्रवारी केला. नियमबाह्य पद्धतीने पालिका आयुक्तांनी हा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मंजूर केल्याने, या विरोधात न्यायालयात जाणार असल्याचे जाधव यांनी सांगितले. त्यामुळे मेट्रो कारशेडचे प्रकरण पुन्हा पेटले आहे.

वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत गुरुवारी भाजपने आपला महत्त्वाकांक्षी प्रस्ताव मंजूर करून घेतला. शिवसेनेचे संख्याबळ अधिक असताना झाडे तोडण्याच्या प्रस्तावाला आठ मते मिळाली. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नेमलेल्या पाचपैकी तीन तज्ज्ञांनी समर्थन दिले. मात्र, समर्थन करणारे चंद्रकांत साळुंखे, सुभाष पाटणे आणि डॉ. शशीरेखा सुरेशकुमार या तज्ज्ञांना आयुक्तांनी दालनात बोलावून, पदावरून हटविण्याची धमकी दिली होती, असा आरोप यशवंत जाधव यांनी केला आहे.

तसेच तज्ज्ञ सुभाष पाटणे यांनी कारशेड उभारणाºया सॅम इंडिया या ठेकेदाराने दीड कोटी रुपये दिले. या तिन्ही तज्ज्ञांनी प्रत्येकी ५० लाख रुपये वाटून घेतले आहेत, असा आरोपही जाधव यांनी केला. या संदर्भातील सर्व कागदपत्रे घेऊन आपण न्यायालयात जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, त्यांच्या या आरोपांचे तज्ज्ञांनी खंडन केले आहे. आम्ही विकास प्रकल्पाला पाठिंबा दिला आहे. मतदान करण्यासाठी आमच्यावर कोणताही दबाव आलेला नाही, असे स्पष्टीकरण या तज्ज्ञांनी दिले आहे.काँग्रेसही न्यायालयात जाणारविरोधी पक्षनेते रवी राजा, सदस्य अमीन कुट्टी व सुषमा राय यांनी, काँग्रेसचा या प्रस्तावाला पूर्वीपासून विरोध होता, असे स्पष्ट केले. या प्रस्तावाला नियमबाह्य पद्धतीने मिळालेल्या मंजुरीविरोधात न्यायालयात बिगर शासकीय संस्थांच्या मदतीने प्रतिज्ञापत्र सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.स्वपक्षीय चार नगरसेवकांना शिवसेनेची नोटीसवृक्षप्राधिकरण समितीच्या बैठकीला ४० मिनिटे उशिरा आलेल्या शिवसेना नगरसेविका सुवर्णा करंजेकर, रिद्धी खुरसुंगे, प्रीती पाटणकर, उमेश माने यांना शुक्रवारी मातोश्रीवर बोलावून जाब विचारण्यात आला. हे सदस्य जर बैठकीला वेळीच आले असते आणि त्याच वेळी प्रस्ताव मंजुरीला टाकला असता, तर प्रस्तावाचे समर्थन करणाऱ्यांची संख्या कमी होती आणि शिवसेनेला सहा मतांच्या जोरावर हा प्रस्ताव फेटाळता आला असता. मात्र, त्यांनी केलेल्या विलंबामुळे सत्तेवर असूनही शिवसेनेचा पराभव झाला, त्यामुळे उशिरा येण्याचा लेखी खुलासा या नगरसेवकांना करावा लागणार आहे. 

आम्ही विकास प्रकल्पाला पाठिंबा दिला आहे. मात्र, आम्ही पैसे घेतलेले नाहीत. हवे तर आमच्या घराची झडती घ्यावी. कोणत्याही पक्षाला समर्थन दिलेले नाही. मतदान करण्यासाठी आमच्यावर कोणताही दबाव आलेला नाही.- सुभाष पाटणे, वनस्पती तज्ज्ञ