राज्यात दीड लाख बालकांचे वजन जन्मत:च अत्यल्प

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 05:20 AM2020-01-08T05:20:12+5:302020-01-08T05:20:19+5:30

राज्यभरात मागील नऊ महिन्यांत १ लाख ४९ हजार ९५९ बालकांचे वजन जन्मत:च अत्यल्प असल्याची धक्कादयक बाब उघडकीस आली आहे.

One and a half lakh children are born in the state | राज्यात दीड लाख बालकांचे वजन जन्मत:च अत्यल्प

राज्यात दीड लाख बालकांचे वजन जन्मत:च अत्यल्प

Next

स्नेहा मोरे 
मुंबई : राज्यभरात मागील नऊ महिन्यांत १ लाख ४९ हजार ९५९ बालकांचे वजन जन्मत:च अत्यल्प असल्याची धक्कादयक बाब उघडकीस आली आहे. यात मुंबई शहर उपनगरात सर्वाधिक कमी वजनाची १६ हजार २५ बाळ जन्मली आहेत. तर २०१८-१९ या काळात राज्यात १ लाख ६४ हजार १५३ बालकांचे वजन जन्मत:च अडीच किलोपेक्षा कमी होते. बाळंतपण रुग्णालयातच व्हावे यासंबंधीची जागरुकता निर्माण झाली असली तरी मातेच्या आरोग्याबाबत अजून बराच पल्ला गाठणे बाकी असल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे.
महिलेच्या गर्भधारणेपासून ते बाळ दोन वर्षांचे होईपर्यंत पोषण, आरोग्य, लसीकरण याकडे होत असलेली हेळसांड बालकाच्या कुपोषणास कारणीभूत ठरत आहे. कमी वयातील लग्न, गर्भधारणेवेळी बॉडीमास इंडेक्स अठराहून कमी असणे, रक्ताच्या नात्यातील लग्न, गर्भवती मातेचा रक्तक्षय, गर्भधारणेवेळी आहारात आवश्यक पोषणमुल्य असलेल्या घटकांचा अभाव आदींमुळे बाळ कमी वजनाचे जन्मने, जन्मत: व्यंग आदी बाबी आढळतात. राज्यात मागील वर्षी एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत मुंबई खालोखाल पुण्यात १५ हजार ६५२ , ठाण्यात ९ हजार ६७४ तर नाशिकमध्ये ८ हजार ८८६ बाळांचे वजन जन्मत:च अडीच किलोपेक्षा कमी आहे.
याविषयी, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. बंदिता सिन्हा यांनी सांगितले की, जन्मत:च बालकाचे वजन कमी असू नये यासाठी मातेने गरोदरपणात काळजी घेणे आवश्यक आहे. रक्तक्षयासंबंधीच्या तपासणीबरोबरच मातेने बालकाचे वजन बरोबर वाढते आहे का हे पाहण्यासाठी नियमित तपासण्या करून घ्याव्यात. रक्तक्षय असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने लोह व फॉलिक अ‍ॅसिडच्या गोळ्या सुरू करणे, प्रथिने, जीवनसत्त्वे, लोह अशा घटकांनी युक्त असा पुरेसा आहार घेणे, बाळंतपणासाठी दवाखान्यात वेळेवर नोंदणी करणेही गरजेचे आहे.
>हे लक्षात असू द्या
किशोरवयीन अवस्थेपासूनच मातेचे पोषण, आरोग्य व्यवस्थित नसल्यास बाळ कुपोषणाकडे ढकलले जाते. जन्मल्यानंतर लगेच बाळाला हिपॅटायटिस बी, बीसीजी, ओरल पोलिओ या तीन लसी देणे गरजेचे आहे. बाळाला दीड महिन्यानंतर पाच लसी एकत्र असलेली एक लस शिवाय ओरल पोलिओ, इंजेक्टेबल पोलिओ, रोटाव्हायरस लस गरजेची आहे. बाळ किमान दोन वर्षाचे होईपर्यंत स्तनपान महत्त्वाचे आहे. ‘डीएचए’ हा मेंदूच्या वाढीसाठी आवश्यक असणारा घटक केवळ मातेच्या दुधात असतो. त्यामुळे स्तनपानाचे महत्त्व अधोरेखित होते. गर्भधारणेपासून ते बाळ दोन वर्षांचे होईपर्यंतचा एक हजार दिवसांचा कालावधी महत्त्वाचा असतो. बाळाच्या मेंदूची ८५ टक्के वाढ याच कालावधीत होत असते. अन्य अवयवांची वाढही या कालावधीत परिणामकारक होत असते. वजन, उंची वाढीचे प्रमाण, डोक्याचा घेर वाढणे यासाठी हा कालावधी महत्त्वाचा आहे. नेमके या कालावधीतच पोषण, आरोग्य, स्वच्छता याकडे दुर्लक्ष झाल्यास बाळ कुपोषित, कमी वजनाचे होते.
>जिल्हा अडीच किलोपेक्षा
कमी वजनाच्या
बाळांची संख्या
मुंबई १६ हजार २५
पुणे १५ हजार ६५२
ठाणे ९ हजार ६७४
नाशिक ८ हजार ८८६
अमरावती ६ हजार ३२
राज्य १ लाख ४९ हजार ९५९

Web Title: One and a half lakh children are born in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.