Join us

मुंबईतील दीड लाख वृद्धांनी अद्यापही घेतली नाही लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2021 4:06 AM

मुंबई - कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी महापालिकेने लसीकरणावर भर दिला आहे. यामध्ये कोरोना संसर्गाच्या उच्च जोखमीच्या श्रेणीत ...

मुंबई - कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी महापालिकेने लसीकरणावर भर दिला आहे. यामध्ये कोरोना संसर्गाच्या उच्च जोखमीच्या श्रेणीत येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे अद्यापही पहिला डोस न घेतलेल्या दीड लाख ज्येष्ठ नागरिकांचा शोध महापालिका घेत आहे.

मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ५८ लाख नागरिकांना लस देण्यात आली आहे. यापैकी ११ लाखांहून अधिक नागरिकांनी दोन डोस घेतले आहेत. मुंबईतील सुमारे ११ लाख ज्येष्ठ नागरिक आहेत. यापैकी साडेनऊ लाखांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे, मात्र अद्यापही दीड लाख वृद्धांनी पहिला डोसही घेतलेला नाही.

ऑगस्ट महिन्यापर्यंत कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. त्यापूर्वी मुंबईतील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्याचा निर्धार पालिका प्रशासनाने केला आहे. त्यानुसार दररोज सरासरी एक लाख नागरिकांचे लसीकरण करण्यावर भर दिला जात आहे, मात्र ज्येष्ठ नागरिक अति जोखमीच्या गटात येत असल्याने त्यांना पहिले सुरक्षित करणे आवश्यक आहे. त्यामुळे अद्याप लस न घेतलेल्या दीड लाख वृद्धांशी पालिकेचा आरोग्य विभाग संपर्क साधत आहे.