Join us

मुंबई विमानतळावर सव्वा लाख आरटीपीसीआर चाचण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 4:06 AM

दोन महिन्यांतील आकडेवारी; दुसरी लाट आटोक्यात आणण्यासाठी खबरदारीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आणण्यासाठी मुंबई ...

दोन महिन्यांतील आकडेवारी; दुसरी लाट आटोक्यात आणण्यासाठी खबरदारी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आणण्यासाठी मुंबई विमानतळाने अधिक सतर्कता दाखवत दोन महिन्यात तब्बल सव्वा लाख प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी केली आहे.

मार्चपासून कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण होते. अशावेळी मुंबई विमानतळाने अधिक खबरदारी घेत तेथे दाखल होणाऱ्या प्रवाशांना कोरोना अहवाल बंधनकारक केला. ज्या प्रवाशांकडे अहवाल नसेल, त्यांना विमानतळावर कोरोना चाचणीची सुविधा उपलब्ध करून दिली. दि. ७ मार्च २०२१पासून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत येथे तब्बल १ लाख २५ हजार प्रवाशांची चाचणी करण्यात आली. त्यामुळे मुंबई विमानतळावरील एकूण चाचण्यांनी ३ लाख ४५ हजारांचा टप्पा ओलांडला आहे.

सध्या मुंबईतील रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याचे चित्र आहे. परंतु, परराज्यांतून येणाऱ्या प्रवाशांमुळे पुन्हा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी प्रत्येक प्रवाशाला कोरोना चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या अहवालाची वैधता केवळ ४८ तास आहे. या नियमाबाबत अनेक प्रवाशांना माहिती नाही. त्यामुळे त्यांना मुंबईत पोहोचल्यावर पुन्हा चाचणी करावी लागते, अशी माहिती विमानतळावरील अधिकाऱ्यांनी दिली.

* किती पैसे घेतात?

६०० रुपये - ८ ते २२ तासांत अहवाल

४,५०० रुपये - १३ मिनिटांत अहवाल

-----------------------------