लहान मुलांसाठी कोविड केंद्रात दीड हजार खाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:06 AM2021-07-23T04:06:08+5:302021-07-23T04:06:08+5:30
मुंबई : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट ऑगस्टनंतर येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. यामध्ये संसर्गाचा सर्वाधिक धोका लहान मुलांना असल्याने ...
मुंबई : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट ऑगस्टनंतर येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. यामध्ये संसर्गाचा सर्वाधिक धोका लहान मुलांना असल्याने पालिकेने जम्बो कोविड केंद्रांमध्ये लहान मुलांसाठी स्वतंत्र दीड हजार खाटा राखून ठेवल्या आहेत, तसेच ७० टक्के ऑक्सिजन खाटा, तर १० ते १५ टक्के अतिदक्षता विभागातील खाटा राखीव असणार आहेत.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार आता मुंबईत पूर्णपणे नियंत्रणात आला आहे. रुग्णवाढीचा सरासरी दैनंदिन दर ०.०६ टक्का एवढा आहे, तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधीही एक हजार दिवसांहून अधिक आहे. २४ प्रशासकीय विभागांपैकी बहुतांशी विभाग कोरोनामुक्तीच्या मार्गावर आहेत. सध्या सहा हजार सक्रिय रुग्ण असल्याने बहुतांशी कोविड केंद्रे व तीन जम्बो केंद्रे पालिकेने बंद केली आहेत.
तिसरी लाट येण्याचा धोका आरोग्यतज्ज्ञांनी वर्तवला आहे. त्यामुळे दहिसर, मालाड, गोरेगाव येथील नेस्को, वरळी येथील एनएससीआय, रिचर्ड अँड क्रुडास भायखळा आणि मुलुंड, अशा जम्बो केंद्रांमध्ये तब्बल २० हजार खाटांचे नियोजन पालिकेने केले. सोमय्या मैदान येथे बाराशे खाटांचे केंद्र उभारण्यात येणार आहे.
अशा वाढवण्यात येणार खाटा
* सोमय्या मैदान येथे १,२०० खाटांचे कोविड केंद्र उभारण्यात येणार आहे. या केंद्रामुळे चेंबूर, माहूल, ट्रॉम्बे, देवनार, गोवंडी, कुर्ला, चुनाभट्टी, शीव या भागातील रुग्णांना दिलासा मिळणार आहे.
* महालक्ष्मी रेसकोर्स येथे ५०० खाटा, तर कांजूरमार्ग केंद्रामध्ये नऊशे खाटा उपलब्ध करण्यात येणार आहेत.
* रुग्णसंख्या कमी असल्याने सध्या दहिसर, वांद्रे- कुर्ला संकुल, मुलुंड येथील जम्बो केंद्रे बंद ठेवण्यात आली आहेत. तिसऱ्या लाटेदरम्यान ही केंद्रे गरजेनुसार पुन्हा सुरू करण्यात येतील.
* वांद्रा - कुर्ला संकुलात २,३०० खाटा, वरळीच्या एनएससीआय केंद्रामध्ये पाचशे खाटा उपलब्ध आहेत, तर अंधेरी येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात १,८५० खाटा आहेत.