मुंबई : आॅनलाइन खरेदी केलेली साडी परत करण्यासाठी वरळी कोळीवाड्यातील गृहिणीने गुगलद्वारे ग्राहक सेवा क्रमांक मिळवला. मात्र हा क्रमांक भामट्याचा निघाल्याने पंधराशेची साडी त्यांना ३८ हजार रुपयांना पडली. वरळी कोळीवाडा परिसरात राहणाऱ्या ममता उमानाथ शेट्टी (४३) यांनी ‘क्रेझी अॅण्ड डिमांड’ या संकेतस्थळावरून आॅनलाइन साडी खरेदी केली. साडीचे त्यांनी पंधराशे रुपये दिले. मात्र साडी न आवडल्याने त्यांनी ती परत करण्याचे ठरविले.
गुगलवरून संबंधित संकेतस्थळाचा ग्राहक सेवा क्रमांक मिळवून संपर्क साधला. तेव्हा ग्राहक सेवा प्रतिनिधीने त्यांना साडीचे पैसे परत करण्यासाठी एटीएम कार्डवरील शेवटचे ६ क्रमांक सांगण्यास सांगितले. त्यांनी सुरुवातीला नकार दिला. मात्र क्रमांक सांगितला नाही तर पैसे परत मिळणार नाहीत, असे म्हणताच शेट्टी यांनी क्रमांक सांगितला. मात्र या खात्यावर पैसे जमा होत नाही आहेत, असे सांगून अन्य एटीएम क्रमांकावरील माहिती देण्यास सांगितली. त्यांनी मुलाच्या एटीएम कार्डवरील क्रमांक सांगितले. थोड्या वेळाने त्यांच्या बँक खात्यावर यूपीआय क्रमांक चालू झाल्याचा संदेश धडकला. या प्रकारामुळे त्यांना धक्का बसला. त्यांनी त्या क्रमांकावर संपर्क साधून याबाबत जाब विचारला. तेव्हा त्या तरुणाने उडवाउडवीची उत्तरे दिली. संशय आल्यामुळे त्या बँकेत गेल्यावर त्यांना बँकेतून ३० हजार ९९९ चे व्यवहार झाल्याचे लक्षात आले. त्यांनी मुलाच्या खात्याबाबत सांगितले, तेव्हा चौकशीत मुलाच्या खात्यातूनही ७ हजार गेल्याचे समजले. पंधराशे रुपयांच्या साडीत त्यांचे ३७ हजार ९९९ रुपये गले. अखेर गुरुवारी त्यांच्या तक्रारीवरून दादर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.ठगांचे नंबर संकेतस्थळावरकाही ठगांनी गुगलवर बँकेच्या तसेच विविध संकेतस्थळांवर स्वत:चे संपर्क क्रमांक टाकून ठगीचा नवा धंदा सुरू केला आहे. याबाबत सायबर पोलिसांकडून बँकांना तसेच गुगलही कळविण्यात आले. अशा प्रकारामुळे सायबर पोलिसांपुढील आव्हान वाढले आहे.