अपघातप्रकरणी एकाला अंधेरीत अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:07 AM2021-02-16T04:07:06+5:302021-02-16T04:07:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई: अंधेरी पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोटारसायकल ट्रकला धडकल्याने प्रमोद कालेकर (४४) या मोटरसायकलस्वाराचा शनिवारी मृत्यू झाला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: अंधेरी पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोटारसायकल ट्रकला धडकल्याने प्रमोद कालेकर (४४) या मोटरसायकलस्वाराचा शनिवारी मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी जितेंद्र पाल (२५) नामक ट्रकचालकाला अटक केली.
दहिसर ते अंधेरी पूर्वच्या मेट्रो लाइन ७ साठी ट्रकमधून ब्लॉक उतरविण्याचे काम सुरू होते. पाल या ट्रकचा चालक होता आणि त्याने रस्त्याच्या मधोमध गाडी उभी केली होती. त्यामुळे अन्य वाहनचालकांनी सतर्क व्हावे, यासाठी आवश्यक सूचना फलक महामार्गावर लावणे गरजेचे होते; मात्र पाल याने फलक न लावल्याने कालेकर यांची मोटारसायकल ट्रकला जाऊन धडकली. यात डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे बसलेले मुकेश मिश्रा (२८) यांनाही गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दाेघेही भायखळ्याचे रहिवासी असून, गोरेगाव फिल्म सिटी येथे कार्यरत होते.
अपघातानंतर पाल हा जखमींना कोणतीही वैद्यकीय मदत न पुरवता घटनास्थळाहून पसार झाला होता. अंधेरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय बेलगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जयदीप उदगे यांनी अवघ्या काही तासांत पाल याला अटक केली.