सारसोळेतील घरफोडी प्रकरणी एकास अटक
By admin | Published: January 14, 2015 02:40 AM2015-01-14T02:40:02+5:302015-01-14T02:40:02+5:30
घरफोडीच्या उद्देशाने महिला पोलिसासह तिच्या पतीवर हल्ला झाल्याची घटना ९ जानेवारीला घडली. याप्रकरणी पोलिसांनी सराईत गुन्हेगाराला अटक केली.
नवी मुंबई : घरफोडीच्या उद्देशाने महिला पोलिसासह तिच्या पतीवर हल्ला झाल्याची घटना ९ जानेवारीला घडली. याप्रकरणी पोलिसांनी सराईत गुन्हेगाराला अटक केली.
सारसोळे गाव महिला पोलीस कर्मचारी विनंती पाटील व पती रवींद्र पाटील यांच्या घरी पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास एक चोर त्यांच्या घरात घुसला. स्वयंपाक खोलीची स्लायडिंग खिडकी उघडून त्याने आत प्रवेश केला होता. चोराची चाहूल लागताच रवींद्र यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार आलेल्या मार्गाने पळणाऱ्या चोराचा पाय त्यांनी पकडला. त्यावेळी चोरट्याने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. तसेच विनंती पाटील ह्या देखील पतीच्या मदतीला धावल्या असता त्यांच्याही हातावर त्याने वार करून खिडकीतून पळ काढला होता. याप्रकरणी तपासादरम्यान एक सराईत गुन्हेगार त्या परिसरात वावरत होता अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार अरविंद विश्वास (३०) याला अटक केल्याचे पोलीस उपआयुक्त शहाजी उमाप यांनी सांगितले.
नेरूळ गाव येथील काशिनाथ पाटील चाळीमध्ये तो अनेक दिवसांपासून राहत होता. त्यानुसार भाडोत्रीची माहिती पोलिसांना न दिल्याप्रकरणी घरमालकावर कारवाई होणार असल्याचेही उमाप यांनी सांगितले. अरविंदच्या घरातून ८ सुरे, ५ स्क्रू ड्रायव्हर, पकड, हातोडा असे दरोड्याचे साहित्य जप्त केले आहे. त्याशिवाय रोख रक्कम, २५ मेमरी कार्ड व ६ सिमकार्ड देखील त्याच्याकडे आढळून आले आहेत. पाटील यांच्या घरी घरफोडी करण्यापूर्वी त्याने इतर एका ठिकाणी चोरी केली. तेथून एक चाकू व २ मोबाइल फोन चोरले होते. चोरलेल्या चाकूने त्याने पाटील दाम्पत्यावर हल्ला केला.
सहाय्यक आयुक्त विवेक मासाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता अल्फांसो यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक नागराज मजगे, सहाय्यक निरीक्षक मंगेश पालांडे, जगवेंद्रसिंग राजपूत, पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली. मंगळवारी त्याला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या कामगिरीबद्दल उपआयुक्त उमाप यांनी तपास पथकाला १० हजारांचे बक्षीस जाहीर केले. (प्रतिनिधी)
- चिल्लरच्या नादाने बनला दरोडेखोर /२