किडनी तस्करीप्रकरणी एकाला अटक, सहार पोलिसांची कारवाई : अधिक तपास सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 03:40 AM2017-09-08T03:40:48+5:302017-09-08T03:41:11+5:30
भारतीय नागरिकाला त्याच्या किडनीचा सौदा करण्यासाठी इजिप्तमध्ये घेऊन निघालेल्या एकाला सहार पोलिसांनी शनिवारी अटक केली.
मुंबई : भारतीय नागरिकाला त्याच्या किडनीचा सौदा करण्यासाठी इजिप्तमध्ये घेऊन निघालेल्या एकाला सहार पोलिसांनी शनिवारी अटक केली. किडनी तस्करीत गुंतलेली ही आंतरराष्ट्रीय टोळी पुन्हा कार्यरत झाल्याचा संशय पोलिसांना असून अधिक चौकशी सुरू आहे.
वृचनतला निजामुद्दीन असे अटक केलेल्या या इसमाचे नाव आहे. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने इमिग्रेशन अधिकाºयांनी त्याची चौकशी केली. तेव्हा त्याच्याकडे तीन भारतीय पासपोर्ट सापडले. चौकशीअंती कैरोमध्ये तो भारतीय नागरिकांना त्यांच्या किडनीचा सौदा करण्यासाठी नेत असल्याची कबुली त्याने दिली. किडनी डोनर शोधायचा, त्यानंतर त्याला कैरोला नेण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे तयार करायची. तसेच त्यांना परदेशात घेऊन जायचे, ही कामे तो करत असल्याचेही त्याने सांगितले. या कामाचे त्याला प्रत्येकी चाळीस हजार रुपये मिळायचे. त्याने अनेकांना कैरोला पाठविल्याचेही तपासात उघड झाले आहे. जानेवारी २०१६ मध्ये एका किडनी रॅकेटचा पर्दाफाश करत पोलिसांनी सुरेश प्रजापती या किडनी तस्कराला अटक केली. त्याने सत्तर भारतीयांना किडनी विक्रीसाठी कोलंबोला पाठविले होते. निजामुद्दीनसोबत सध्या जामिनावर बाहेर असलेल्या प्रजापतीचादेखील यात समावेश असल्याचा संशय पोलिसांना आहे. क्रिकेट सट्टेबाज असलेल्या निजामुद्दीनला सट्टा व्यवसायात नुकसान झाल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून तो प्रजापतीच्या संपर्कात आला आणि त्याच्यासोबत काम करू लागला.