लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : येथील ‘युनिसेक्स’ सलूनमध्ये काम करणाऱ्या ब्युटीशियनसोबत गैरवर्तन करणाऱ्या इसमाला गोरेगावमध्ये गुरुवारी अटक करण्यात आली. या प्रकरणी दीड महिन्याआधी ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अमित जलान उर्फ अमित अगरवाल (३०) असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे.ओशिवरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलूनमध्ये काम करणाऱ्या एका २१ वर्षीय मुलीची जलानने छेड काढली, तिने तेव्हा दुर्लक्ष केले. मात्र, २३ मार्च रोजी त्याने या तिच्याशी अश्लील वर्तन करत, शरीरसुखाची मागणी केली. ही बाब मुलीने सलून मालकिणीला सांगितली. यावर मालकिणीने तिच्यासोबत पोलीस ठाण्यात दाखल होत, जलानविरोधात तक्रार नोंदविली.‘आम्ही या मुलीची तक्रार दाखल करत, त्वरित जलानला अटक करण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठविले. मात्र, तोपर्यंत जलान तिथून फरार झाला होता. त्याचा शोध आम्ही घेत होतो,’ असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष खानविलकर यांनी सांगितले. ठाण्यात राहाणारा जलान हा अभिलेखावरील गुन्हेगार आहे. त्याने पोलिसांना स्वत:चे नावही खोटे सांगितले होते. मात्र, पोलिसांनी त्याचे खरे नाव शोधून काढले. स्वत:ला पोलिसांचा खबरी म्हणविणारा जलान याच्यावर मालाडमध्ये दोन खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. यातील एकात त्याने पोलीस असल्याची बतावणी करत पैशाची मागणी केली होती, तर दिंडोशीतही त्याच्यावर मारामारीचा गुन्हा दाखल आहे.बांगुरनगर पोलिसांनी गुरुवारी त्याला अटक करत, ओशिवरा पोलिसांच्या स्वाधीन केले. अभिलेखावरील गुन्हेगार असल्याने पोलिसांनी त्याला जामीन नाकारला. त्यामुळे त्याने न्यायालयात धाव घेतली. त्याला न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आल्याचे खानविलकर यांनी सांगितले.
अश्लील वर्तणुकीप्रकरणी एकाला अटक
By admin | Published: June 17, 2017 2:18 AM