सव्वादोन लाखांच्या अमली पदार्थासह एकाला अटक
By admin | Published: April 24, 2017 02:48 AM2017-04-24T02:48:44+5:302017-04-24T02:48:44+5:30
अंधेरीच्या लोखंडवाला परिसरात अमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी आलेल्या एका तस्कराला, अमली पदार्थविरोधी पथकाच्या
मुंबई : अंधेरीच्या लोखंडवाला परिसरात अमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी आलेल्या एका तस्कराला, अमली पदार्थविरोधी पथकाच्या वांद्रे युनिटने शनिवारी अटक केली. या आरोपीकडून अधिकाऱ्यांनी तब्बल सव्वादोन लाख रुपयांचे कोकीन हस्तगत केले.
गेल्या काही दिवसांत शहरात अमली पदार्थांच्या तस्करीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे ही तस्करी रोखण्यासाठी अमली पदार्थविरोधी पथकाकडून शहरात जोरदार कारवाया सुरू आहेत. शनिवारी रात्री अंधेरी लोखंडवाला येथील तुळजाभवानी चौक परिसरात अमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात तस्करी होणार असल्याची माहिती अमली पदार्थविरोधी पथकाच्या वांद्रे युनिटला मिळाली होती.
त्यानुसार, पथकातील अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सापळा रचून पीटर उबाडी (२४) या आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांनी तत्काळ त्याची झडती घेतली. झडतीमध्ये त्याच्याजवळ असलेल्या बॅगेमध्ये पोलिसांना २ लाख २० हजार रुपये किमतीचे ४४ गॅ्रम कोकीन मिळाले. पीटरला अटक करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. (प्रतिनिधी)