लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी संजय राठाेड यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतलेल्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांना जिवे ठार मारण्याच्या धमकीचा कॉल, व्हिडिओबरोबरच फोटो मॉर्फ केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात सायबर पोलीस अधिक तपास करीत आहेत. या प्रकरणात यवतमाळ येथून एकाला अटक करण्यात आली.
राहुल तुळशीराम आडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. चित्रा वाघ यांचे मॉर्फ केलेले फोटो व्हायरल झाल्यानंतर वाघ यांनी फोटोंसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे तक्रार केली होती. मुंबई पोलिसांकडे कारवाईची मागणी करीत वाघ यांनी सायबर विभागाच्या पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांची भेट घेत तक्रार दिली.
वाघ यांनी केलेल्या तक्रारीत फोटो मॉर्फिंगबरोबर धमकीचे कॉलही येत असल्याचे सांगितले, तसेच काही अश्लील कमेंट्सही केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. काही कॉल, व्हिडिओद्वारे जिवे ठार मारण्याची धमकीही देत असल्याचे नमूद केले होते. त्यानुसार बीकेसी येथील सायबर पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यानुसार, पोलिसांनी गुन्हा नोंदवीत तपास सुरू केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी विनयभंग, जिवे ठार मारण्याची धमकी, आयटी ॲक्टनुसार, गुन्हा नोंद करीत तपास सुरू केला आहे. या प्रकरणात यवतमाळचे कनेक्शन उघड होताच आडेला बेड्या ठोकल्या, तर अन्य साथीदाराचा शोध सुरू आहे.