Join us

मुंबईत २२ लाखांत मिळणार १ BHK; जुलै महिन्यांत म्हाडा काढणार ४ हजार घरांची लॉटरी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 7:31 AM

घराचे स्वप्न बघणाऱ्या सर्वसामान्यांना म्हाडाने एक खूशखबर दिली आहे.

मुंबई : घराचे स्वप्न बघणाऱ्या सर्वसामान्यांना म्हाडाने एक खूशखबर दिली आहे. म्हाडा आता जुलै महिन्यांत गोरेगाव परिसरात ४ हजार घरांची लॉटरी काढणार आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून याबाबतची तयारी सुरू झाली आहे. मुंबईच्या उपनगरात म्हाडाकडून सर्वसामान्यांना परवडतील अशी वन बीएचके घरी उभारली जात आहेत. 

विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई मंडळाकडून काढण्यात येणाऱ्या घरांच्या लॉटरीत अत्यल्प गटाकरिता सुमारे दोन हजार घरांचा समावेश असणार आहे. पहाडी गोरेगाव येथे वन बीएचके आकाराची असणारी ही घरे अगदी परवडणाऱ्या किंमतीत म्हणजे २२ लाखांत उपलब्ध होणार  आहेत.

गोरेगाव येथे बांधण्यात येणारी १,९४७ घरे अत्यल्प उत्पन्न गटासाठी असणार आहेत. सर्वसामान्यांना केंद्रस्थानी ठेवूनच हा प्रकल्प  साकारला  जात आहे. तर लॉटरीतील उर्वरित घरे ही उन्नत नगर येथे असणार आहेत. गोरेगाव पश्चिम येथील बांगूर नगर परिसरातील पहाडी गोरेगावमध्ये २३ माळ्याच्या सात इमारती उभ्या राहत आहेत. यात अत्यल्प उत्पन्न गटासाठी १ हजार २३९ घरे असणार आहेत. सुमारे ३२२.६० चौरस फूट असे घराचे क्षेत्रफळ असणार आहे. घराची किंमत २२ लाख असेल.

मध्यम उत्पन्न गटासाठी २२७  घरे आहेत. क्षेत्रफळ ७९४.३१ चौरस फूट असेल. याची किंमत ५६ लाख आहे. उच्च उत्पन्न गटासाठी १०५ घरे. त्याचे क्षेत्रफळ ९७८.५६ चौरस फूट असेल. याची किंमत ६९ लाख असेल.

प्रकल्प २ उन्नत नगर क्रमांक २

उन्नत नगर क्रमांक २ येथील प्रेम नगरमध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी ७०८ घरे असणार आहेत. अल्प उत्पन्न गटासाठी  ७३६ घरे असणार आहेत. ही घरे ४८२.९८ चौरस फुटांची असतील. याची किंमत ३० लाख असेल. 

टॅग्स :म्हाडामुंबई