एक रक्तदाता तीन लोकांचे जीव वाचवितो; त्यामुळे 'लोकमत'शी रक्ताचं नातं जोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:06 AM2021-07-09T04:06:26+5:302021-07-09T04:06:26+5:30
मुंबई : कोरोना काळात रक्ताची, प्लाझ्माची गरज मोठ्या प्रमाणावर भासू लागली. लोकमत समूहाचे सर्वांशीच रक्ताचे नाते असल्यामुळे सामाजिक भान ...
मुंबई : कोरोना काळात रक्ताची, प्लाझ्माची गरज मोठ्या प्रमाणावर भासू लागली. लोकमत समूहाचे सर्वांशीच रक्ताचे नाते असल्यामुळे सामाजिक भान ठेवत कोरोना काळात रक्ताचा तुटवडा दूर करण्यासाठी 'लोकमत'ने ही मोठी एक समाजसेवा हाती घेतली. ज्यांना ज्यांना वाटते आहे की आपण रक्तदान करावे, त्यांनी आपल्या समाजाला याद्वारे हातभार लावावा. कारण एक रक्तदाता तीन लोकांचे जीव वाचवितो. त्यामुळे असे अदृश्य आशीर्वाद आपणाला मिळावे असे वाटत असेल तर रक्तदान करा. लोकमत रक्ताचं नातं यांना सहकार्य करा, असे आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले.
लोकमत समूहाच्या वतीने १ ते १५ जुलै या कालावधीत राज्यभर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. याच मोहिमेचा एक भाग म्हणून ८ जुलै रोजी वांद्रे - कुर्ला संकुलातील भारत डायमंड बोर्सच्या सहकार्याने बोर्समधील ट्रेडिंग हॉल, टॉवर एच वेस्टमध्ये आयोजित रक्तदान शिबिराला दिलेल्या भेटीदरम्यान महापौर किशोरी पेडणेकर बोलत होत्या. यावेळी उपमहापौर अॅड. सुहास वाडकर हे देखील उपस्थित होते.
महापौर किशोरी पेडणकर म्हणाल्या, लोकमत समूहाने १ ते १५ जुलैदरम्यान राज्यभरात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. मुळात कोरोना काळात आपल्याला रक्ताचा मोठा तुटवडा भासला. रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी लोकमत समूहातर्फे आयोजित रक्तदान शिबिरात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे.
खासदार गोपाळ शेट्टी यांनीदेखील रक्तदान शिबिराला भेट दिली. तत्पूर्वी शेट्टी यांनी भारत डायमंड बोर्सच्या प्रशासकीय कार्यालयात बोर्सच्या पदाधिकाऱ्यांसह सदस्य मंडळाची भेट घेतली. त्यानंतर शेट्टी आणि लाड यांनी बोर्सच्या सदस्य मंडळासोबत येथे आयोजित करण्यात आलेल्या लसीकरण उपक्रमाला भेट दिली. शिवाय येथील सुरक्षा व्यवस्था कशी चोख आहे? याची माहिती सदस्य मंडळाने शेट्टी आणि लाड यांना प्रत्यक्षात दिली. रक्तदात्यांशीदेखील संवाद साधला. यावेळी शेट्टी आणि लाड यांनी लोकमत समूहाच्या सहयोगाने भारत डायमंड बोर्सने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे कौतुक करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, यावेळी भारत डायमंड बोर्सचे अध्यक्ष अनुप मेहता, उपाध्यक्ष मेहुल शाह, खजिनदार अनुप झवेरी, सहसचिव परेश मेहता, सचिव किरण गांधी आणि सदस्य किरीट भन्साळी, महेश वघानी, रमणीकलाल शाह, सुरेंद्र दासानी, जेम्स ज्वेलर्स एक्सपोर्ट प्रमोशन काैन्सिलचे विभागीय अध्यक्ष अशोक गजेरा, सदस्य अरविंद ढोलकिया आणि भारत डायमंड बोर्सचे सहायक महाव्यवस्थापक सुजित शाह, आदी मान्यवर उपस्थित होते.
फोटो आहे - पेडणेकर
फोटो ओळ- वांद्रे-कुर्ला संकुलातील भारत डायमंड बोर्सच्या सहकार्याने बोर्समधील ट्रेडिंग हॉल, टॉवर एच वेस्टमध्ये गुरुवारी आयोजित लोकमत समूहाच्या रक्तदान शिबिराला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भेट दिली.