एक बल्ब, दोन बिस्किटांच्या पुड्यांवर दिवसभर राबले, अखेर वीजपुरवठा झाला सुरळीत; आनंद महिंद्रांनी केलं कौतुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2020 11:26 AM2020-10-18T11:26:14+5:302020-10-18T11:28:15+5:30
महापारेषणची कळवा-तळेगाव (पॉवरग्रीड) वाहिनी पूर्ववत करण्यासाठी तब्बल १०० अभियंते आणि कर्मचारी अहोरात्र काम करीत होते. लोणावळा-कर्जतच्या घाटात प्रचंड धुके आणि सततच्या पावसातही त्यांनी काम सुरूच ठेवले. अखेर गुरुवारी रात्री आठ वाजता वाहिनीचे काम पूर्ण झाले. (Anand Mahindra)
मुंबई : एक बल्ब आणि दोन बिस्किटांच्या पुड्यावर अथक परिश्रमाअंती दिवस-रात्र काम करून महापारेषणच्या अभियंते आणि कर्मचाऱ्यांनी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरातील वीजपुरवठा सुरळीत केला.
महापारेषणची कळवा-तळेगाव (पॉवरग्रीड) वाहिनी पूर्ववत करण्यासाठी तब्बल १०० अभियंते आणि कर्मचारी अहोरात्र काम करीत होते. लोणावळा-कर्जतच्या घाटात प्रचंड धुके आणि सततच्या पावसातही त्यांनी काम सुरूच ठेवले. अखेर गुरुवारी रात्री आठ वाजता वाहिनीचे काम पूर्ण झाले. महापारेषणचे अध्यक्ष दिनेश वाघमारे यांनी संचालक (संचलन) संजय ताकसांडे आणि त्यांच्या टीमचे याबद्दल कौतुक केले.
मुंबईसह ठाणे, कल्याण व रायगड जिल्ह्यातील काही भागांचा सोमवारी सकाळी १० वाजता खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत होण्यास सोमवारच्या रात्रीचे साडेबारा वाजले. भांडुप आणि ठाणे परिसरात सोमवारी रात्री साडेबारा ते एक वाजता वीजपुरवठा पूर्ववत झाला होता.
मुंबईला वीजपुरवठा करणाºया कळवा, पडघा, खारघर ट्रान्सफॉर्मर वाहिनी बंद झाल्याने मुंबई व मुंबई उपनगरचा २२०० मेगावॅट वीजपुरवठा खंडित झाला होता. तिन्ही मार्गांवरील लोकल सेवेलादेखील त्याचा फटका बसला. सिग्नल यंत्रणा ठप्प पडली. बँकांनी तर शटर डाऊन केले होते. एटीएममध्ये पैसे असले तरी बॅटरी बॅक अप नसल्याने ग्राहकांना अडचणी आल्या. शाळा आणि महाविद्यालयांचे आॅनलाइन क्लास तसेच ‘वर्क फ्रॉम होम’लाही फटका बसला होता.
आनंद महिंद्रा यांनी केले कौतुक
मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महापारेषणकडून वेगाने काम करण्यात आले. सततचा पाऊस आणि धुके असतानाही महापारेषणच्या कर्मचाऱ्यांनी चोख काम केल्याने महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी महापारेषणच्या कामाचे कौतुक केले. आपला जीव धोक्यात घालून काम करणाºया कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करू या, असा संदेश त्यांनी सोशल मीडियाद्वारे दिला.