कुर्ला नेहरुनगर येथे तरुण राबवणार एक नगर एक होळी उपक्रम
By मनोहर कुंभेजकर | Published: March 21, 2024 05:20 PM2024-03-21T17:20:02+5:302024-03-21T17:20:25+5:30
होळीच्या दिवशी विविध इमारतींमध्ये होळी पेटविण्यात येते. त्यासाठी परिसरातील झाडांच्या फांद्या तोडल्या जातात, कधी कधी तर संपूर्ण झाडही तोडले जाते.
मुंबई-कुर्ला पूर्व येथील नेहरुनगर या म्हाडाच्या वसाहतीमध्ये होळीचा उत्सव एकत्रितपणे साजरा व्हावा या दृष्टीने येथील तरुणांनी एक नगर एक होळी असा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यातून सर्व नागरिक एकत्र येतील तसेच पर्यावरणाची होणारी हानी काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल. यासाठी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर येत्या रविवार दि,२४ मार्च रोजी होलिकोत्सवानिमित्त रात्री ८ वाजता एकच सार्वजनिक होळी साजरी करण्यात येणार आहे.
काही दिवसांपासून मुंबई शहर आणि परिसरात हवेचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होऊ लागले आहे. होळीच्या दिवशी विविध इमारतींमध्ये होळी पेटविण्यात येते. त्यासाठी परिसरातील झाडांच्या फांद्या तोडल्या जातात, कधी कधी तर संपूर्ण झाडही तोडले जाते. मात्र अशी झाडांची कत्तल करण्यापेक्षा, वखारींमधून लाकडे आणून ती जाळून धूर वाढविण्यापेक्षा सर्वांनी एकत्र यावे आणि एकच होळी सर्व इमारतींमधील नागरिकांच्या सहकार्याने पेटवावी, असे आवाहन नेहरुनगरमधील काही तरुणांनी केले असून त्याला रहिवाशांनी पाठिंबा दिला आहे.
जास्तीत जास्त होळ्या पेटविण्याऐवजी एकच सार्वजनिक होळी पेटवावी आणि पर्यावरणाचा होणारा –हास थांबवावा, हवेचे प्रदूषण रोखावे, तसेच होलिकोत्सव एकत्रित साजरा करून नगरातील एकोपा वाढावावा, असे आवाहन येथील तरुणांनी केले आहे.