मुंबई : सर्वसामान्य नागरिकांना मिळणाऱ्या लसींची संपूर्ण माहिती राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना एका क्लिकवर समजणार आहे. राज्यातील लसीकरण कार्यक्रमाविषयी माहिती मिळावी यासाठी आरोग्य विभागाने हा नवा निर्णय घेतला आहे. मोबाइल व संगणकाच्या माध्यमातून ही माहिती मिळेल. तसेच, तापमान सनियंत्रण प्रणालीही लागू करण्याची प्रक्रिया सुरू आहे.राज्यातील जिल्हा परिषदेची ९६ प्राथमिक आरोग्य केंद्रे व ५५५ उपकेंद्रे आहेत. तसेच, एक जिल्हा रुग्णालय, दोन उपजिल्हा, २४ ग्रामीण रुग्णालये व महापालिका हद्दीतील रुग्णालयांसह जिल्हा रुग्णालयांमार्फत आरोग्याच्या सुविधा दिल्या जात आहेत. यांपैकी १५४ ठिकाणांवरून विविध प्रकारचे लसीकरण केले जाते. या सर्व ठिकाणी लसी ठेवण्यासाठी फ्रीजची व्यवस्था करण्यात आली आहे. भारनियमनामुळे तापमान कमी-जास्त झाल्यानंतर लसी खराब होण्याच्या घटना घडत होत्या. अशा घटना घडू नयेत म्हणून आता आरोग्य विभागाने कडक पावले उचलली आहेत. तापमान सनियंत्रण प्रणाली सुरू केली आहे. महापालिका प्रशासनाच्या रुग्णालयासह जिल्हा व तालुकास्तरीय आरोग्य केंद्रात ही प्रणाली लवकरच सुुरू होईल.या प्रणालीच्या माध्यमातून लसी ठेवलेल्या फ्रीजमधील तापमानाची माहिती संबंधित केंद्रातील कर्मचारी व तालुका वैद्यकीय अधिकारी, जिल्हा स्तरावरील तंत्रज्ञ, जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी, जिल्हा आरोग्याधिकारी आदींना समजणार आहे. जिल्ह्यातील १५४ ठिकाणी शीतसाखळी केंद्रांत ही प्रणाली सुरू करण्याचे काम सुरू आहे. या प्रणालीमुळे कोणत्या केंद्रावर किती लसी उपलब्ध आहेत, याची माहिती सर्वांना एका क्लिकवर मिळेल.तापमानावर अवलंबून असते गुणवत्तातापमान नियंत्रित न राहिल्याने बºयाच वेळा लसी खराब होत होत्या. मात्र, आता तापमान सनियंत्रण प्रणाली सुरू केल्याने लसी खराब होण्याच्या घटना टळणार आहेत. लसी ठेवलेल्या फ्रीजमधील तापमान दोन ते आठ अंश सेल्सिअस (प्लस) असणे गरजेचे आहे. यापेक्षा जर तापमान कमी झाले व जास्त झाले, तर लसीची गुणवत्ता कमी होते. तापमान सनियंत्रण प्रणाली फ्रीजमधील तापमान दर्शविते.
आता लसींची माहिती मिळणार एका क्लिकवर; आरोग्य विभागाची लवकरच नवी प्रणाली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2019 5:04 AM