Join us  

महापौरांना धमकीपत्राद्वारे एक कोटीची मागणी

By admin | Published: October 25, 2015 1:03 AM

शहरात दहशत पसरवण्याची धमकी देत १ कोटी रुपयांची मागणी करणारे पत्र महापौर सुधाकर सोनवणे यांना मिळाले आहे. पालिका मुख्यालयात पोस्टाद्वारे त्यांच्या नावे हे पत्र आले आहे.

नवी मुंबई : शहरात दहशत पसरवण्याची धमकी देत १ कोटी रुपयांची मागणी करणारे पत्र महापौर सुधाकर सोनवणे यांना मिळाले आहे. पालिका मुख्यालयात पोस्टाद्वारे त्यांच्या नावे हे पत्र आले आहे. त्यानुसार खबरदारीची बाब म्हणून पोलिसांनी शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षेत वाढ केली आहे.शुक्रवारी पालिका मुख्यालयात आलेली पत्रे वाचत असताना महापौर सुधाकर सोनवणे यांच्या हाती हे धमकीचे पत्र मिळाले. सीबीडी येथील पालिका मुख्यालयातील त्यांच्या कार्यालयात टपालाद्वारे हे पत्र आले आहे. पत्रात गलिच्छ भाषेत शिवीगाळ करीत महापौरांना धमकीचा इशारा देण्यात आलेला आहे. काही ठिकाणी खाडाखोड असून, सांकेतिक आकड्यांचाही समावेश आहे. त्यामुळे अज्ञात व्यक्तीकडून झालेला हा खोडसाळपणा असल्याची शक्यता आहे. परंतु खबरदारीचा उपाय म्हणून महापौरांनी या पत्राची माहिती पोलिसांना देताच शहरातील महत्त्वाच्या ठिकाणच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. पत्रामध्ये कोकण भवन या शासकीय इमारतीसह शहरातील काही रेल्वे स्थानके उडवण्याची धमकी देण्यात आलेली आहे. या पत्रात पोलीसही आपलं काही करू शकणार नाहीत, असा ठाम विश्वासही पत्र पाठवणाऱ्याने व्यक्त केलेला आहे. शहरातला हा दहशतवाद टाळण्यासाठी महापौरांकडे १ कोटी रुपयांची मागणी त्यामध्ये करण्यात आलेली आहे. त्यामुळे महापौरांनी या पत्राची माहिती पोलिसांना देताच, पोलिसांनी पत्रात नमूद असलेल्या वाशी, रबाळे, ऐरोली अशा स्थानकांची श्वानपथकाद्वारे रात्री उशिरापर्यंत पाहणी केली. त्यामध्ये हाती काहीच लागले नसले तरी त्या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला असल्याचे उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी सांगितले. अशा धमकीच्या पत्राला आपण घाबरत नसून नागरिकांनीही न घाबरण्याचे आवाहन महापौर सुधाकर सोनवणे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)