आॅनलाइन विवाह साइट्सच्या माध्यमातून एक कोटीची फसवणूक
By admin | Published: October 16, 2015 02:42 AM2015-10-16T02:42:35+5:302015-10-16T02:42:35+5:30
सोशल नेटवर्किंग साइट्सवरील विवाहासाठी इच्छुक असलेल्या तरुणींची फसवणूक करणाऱ्या नायजेरियन टोळीच्या मुसक्या आवळण्यात गुन्हे शाखेला यश आले.
मुंबई : सोशल नेटवर्किंग साइट्सवरील विवाहासाठी इच्छुक असलेल्या तरुणींची फसवणूक करणाऱ्या नायजेरियन टोळीच्या मुसक्या आवळण्यात गुन्हे शाखेला यश आले. लग्नाचे आमिष दाखवून या टोळीने एका युवतीला तब्बल एक कोटीचा गंडा घातला होता.
चार्लस टेम ओझोनवारुपआक (३०), आयफेनयी आॅलिव्हर ओडोह (२८) अशी अटक केलेल्या नायजेरियनची नावे आहेत.
शादी डॉट कॉम, जीवनसाथी डॉट कॉम अशा वधूवर सूचक मंडळाच्या संकेतस्थळांवर अनेक तरुण-तरुणी जोडीदार शोधतात. या साइटवर स्वत:ची खोटी ओळख दाखवून ही दुकली विवाहासाठी इच्छुक असलेल्या तरुणींच्या संपर्कात येत होती. खोटी माहिती देऊन ही टोळी फसवणूक करायची. बोरीवलीत राहणाऱ्या एका तरुणीने लग्नाकरिता स्वत:ची माहिती शादी डॉट कॉम या संकेतस्थळावर दिली होती. त्यानंतर ही तरुणी नायजेरियन दुकलीच्या जाळ्यात अडकली.
नायजेरियन्सनी तिच्याशी फेसबुक आणि व्हॉट्सअॅपद्वारे जवळीक निर्माण केली. या तरुणीशी संवाद साधताना परदेशात बिझनेस असून आपण गर्भश्रीमंत असल्याचे त्याने पटवून दिले. तरुणी जाळ्यात येताच लग्नाचे आमिष दाखवून तिच्याकडून तब्बल १ कोटी १ लाख ३५ हजार रुपये त्याने उकळले.
याप्रकरणी एमएचबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत, गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कक्ष ११ने तपास सुरू केला होता. यामध्ये तांत्रिक पुराव्याच्या आधारे गुन्हे शाखेने मालवणी परिसरातून या दुकलीला अटक केली. (प्रतिनिधी)