पूरग्रस्तांसाठी धर्मादाय संस्थांकडून एक कोटीचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:09 AM2021-08-27T04:09:13+5:302021-08-27T04:09:13+5:30
मुंबई : राज्यातील पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयाने पुढाकार घेतला आहे. विविध धर्मादाय संस्थांच्या सहकार्याने आतापर्यंत १ ...
मुंबई : राज्यातील पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयाने पुढाकार घेतला आहे. विविध धर्मादाय संस्थांच्या सहकार्याने आतापर्यंत १ कोटी १ लाख ५९ हजारांचा निधी मुख्यमंत्री साहाय्यता निधीत जमा करण्यात आला आहे.
राज्यात कोकणासह पश्चिम महाराष्ट्राला पुरामुळे मोठ्या प्रमाणावर फटका बसला. जीवित तसेच आर्थिक हानी झाली. या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी आणि उत्तरदायित्व म्हणून स्थापन झालेल्या ट्रस्टनी पुढाकार घेऊन पूरग्रस्तांसाठी शक्य ती मदत करावी, मुख्यमंत्री साहाय्यता निधीमध्ये आर्थिक मदत द्यावी, असे आवाहन धर्मादाय आयुक्त प्रमोद तरारे यांनी केले होते. त्यानुसार विविध संस्थांनी सहकार्याचा हात पुढे केला. आतापर्यंत एक कोटींवर रक्कम मुख्यमंत्री साहाय्यता निधीत जमा करण्यात आली आहे. या मदतीचा तिसरा धनादेश धर्मादाय आयुक्त प्रमोद तरारे यांनी अलीकडेच मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खर्गे यांच्याकडे सुपुर्द केला. ३३ लाख ५६ हजार रुपयांचा हा धनादेश आहे.
यापूर्वी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ५६ लाख ९३ हजारांचा पहिला धनादेश सुपुर्द करण्यात आला होता. तर, दुसऱ्या टप्प्यात ११ लाख रुपये मुख्यमंत्री साहाय्यता निधीत जमा करण्यात आले. तसेच ३३ लाख ५६ हजारांचा तिसरा धनादेश अलीकडेच जमा करण्यात आला. धर्मादाय आयुक्तांच्या आवाहनाला अनेक संस्थांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. पूरग्रस्त भागात जीवनावश्यक वस्तूंच्या रूपात मदत करतानाच मुख्यमंत्री साहाय्यता निधीतही आर्थिक मदत जमा करण्यात आली.