‘एनसीबी’ची नागपाड्यात कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) दक्षिण मुंबईतील नागपाडा परिसरातून रविवारी रात्री एका महिलेला अटक करीत तिच्याकडील १.८ किलो चरस जप्त केले. हुसेनबी असे तिचे नाव असून ती विक्री करीत असलेले चरस जम्मू-काश्मीरमधून आयात करण्यात आलेले होते, त्याची किंमत एक कोटी इतकी असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
मुंबईच्या नागपाडा जंक्शनजवळ एक महिला ड्रग्ज विकण्यासाठी येणार आहे, अशी माहिती एनसीबीला खबऱ्याकडून मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून तिला पकडले. झडतीमध्ये तिच्याकडील पिशवीत १.८ किलो चरस जप्त करण्यात आले. ते नियोजित ठिकाणी पोहोचविण्यासाठी लहान मुले व महिलांचा वापर केला जात होता. हुसेनबी हा माल कोणाला पुरविणार होती, तिचे आणखी कोण-कोण साथीदार आहेत, याची माहिती घेतली जात आहे.