आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी एक कोटीची तरतूद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2020 05:54 AM2020-03-15T05:54:06+5:302020-03-15T05:54:32+5:30
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या संकुलात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह नसल्याने, त्यांना शिक्षण घेण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. राहण्याची व्यवस्था ...
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या संकुलात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह नसल्याने, त्यांना शिक्षण घेण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. राहण्याची व्यवस्था नसल्याने, अनेक विद्यार्थी शिक्षण सोडून पुन्हा गावाला जातात, तर अनेक विद्यार्थी अन्य विद्यापीठाचा मार्ग अवलंबतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करताना तारेवरची कसरत करावी लागते. त्यांचा हा त्रास कमी व्हावा, यासाठी त्यांच्यासाठी वसतिगृह उभारणीसाठी १ कोटी रुपयांची तरतूद मुंबई विद्यापीठाच्या २०२०-२१ सालच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
या अर्थसंकल्पात शैक्षणिक सुविधा (नवीन अभ्यासक्रम व त्या संदर्भातील उपक्रम) यासाठी १० कोटी, स्व. बाळासाहेब ठाकरे कला आणि सांस्कृतिक केंद्रासाठी ९ कोटीं अशाप्रकारे विविध शैक्षणिक कामांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.
२०२०-२०२१ या वर्षामध्ये नियोजित बांधकामांना विशेष प्राधान्यक्रम देण्यात आला असून, यामध्ये स्कूल आॅफ लँग्वेजेस इमारत (२रा टप्पा), आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृह (२रा टप्पा), चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांकरिता निवासस्थान टाइप-२, नवीन ग्रंथालय इमारत, नवीन परीक्षा भवन, प्रा. बाळ आपटे दालन, मुलींचे नवीन वसतिगृह, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृह (१ला टप्पा), राजीव गांधी इमारत (२रा टप्पा), वर्कशॉप इमारतीची दुरुस्ती, महर्षी धोंडो केशव कर्वे मुलींच्या वसतिगृहाची दुरुस्ती, आय. टी. पार्क इमारत (आतील कामे) अशा नियोजित बांधकामांना प्राधान्य देण्यात आले आहे.
विद्यापीठाचा अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर, प्रत्येक विभागाला मंजूर निधीचा व्यवस्थित विनियोग होत आहे कीनाही, याची पाहणी आणि देखरेख वर्षभर करणे आवश्यक असल्याचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी सांगितले. यासाठी विद्यापीठ विशेष मॉनिटरिंग कमिटीची स्थापना करेल. ही समिती सुरुवातीपासूनच प्रत्येक विभागाच्या खर्च होणाºया अर्थसंकल्पीय तरतुदीवर लक्ष ठेवेल. दर २ ते ३ महिन्यांनी विभागाच्या प्रमुखांना बोलावून या कमिटीकडून त्याची माहिती घेतली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
अशी आहे निधीची तरतूद (रुपये)
डिसेबल्ड फ्रेंडली कॅम्पस २२.५० कोटी
सिंधुदुर्ग, पालघर, रत्नागिरी, ठाणे उपकेंद्रांतील सुविधा ४० कोटी
शैक्षणिक सुविधा (नवीन अभ्यासक्रम व उपक्रम) १० कोटी
स्व. बाळासाहेब ठाकरे कला आणि सांस्कृतिक केंद्र ९ कोटी
अपग्रेडेशन आॅफ आयसीटी इंफ्रास्ट्रक्चर ५ कोटी
डिजिटल लायब्ररी ५ कोटी
विद्यापीठ परिसराचे सुशोभीकरण ५ कोटी