एक दिवस आधीच मुंबईत बंद! कोरेगाव-भीमा प्रकरणाचे पडसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 07:10 AM2018-01-03T07:10:22+5:302018-01-03T11:04:18+5:30
कोरेगाव-भीमा येथील रॅलीवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आंबेडकरी समाजाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी, ३ जानेवारीला एक दिवसीय महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.
मुंबई - कोरेगाव-भीमा येथील रॅलीवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आंबेडकरी समाजाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी, ३ जानेवारीला एक दिवसीय महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. मात्र या हल्ल्याचे तीव्र पडसाद मुंबईत मंगळवारी सकाळपासूनच उमटू लागल्याने दादर, हिंदमाता, चेंबूर, घाटकोपर अशा विविध ठिकाणी दुपारनंतर कडकडीत बंद पाळण्यात आला. तर सकाळपासूनच चेंबूरच्या रास्ता रोकोपासून गोवंडी येथील रेल रोकोमुळे मुंबईतील वाहतुकीचे तीनतेरा वाजले होते.
कोरेगाव-भीमा प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटत असताना मुंबईतील चेंबूर येथून आंदोलन पेटण्यास सुरुवात झाली. शांततेत काढलेल्या रॅलीचे रूपांतर रास्ता रोकोतून रेल रोकोपर्यंत कधी पोहोचले, हे कळलेच नाही. चेंबूर, कुर्ला, गोवंडी येथे निदर्शने सुरू असताना गोवंडी व चेंबूर येथे चार वेळा रेल रोको करण्यात आला. प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, वाशीकडे जात असलेल्या रेल्वेवर चेंबूरजवळ दगडफेक झाली. त्यानंतर रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्या रेल्वेचे दरवाजे प्रवाशांनी बंद केले होते. महत्त्वाची बाब म्हणजे ही माहिती रेल्वे प्रवाशांनीच एकमेकांना दिल्याने अनर्थ टळला. दरम्यान, या प्रकारामुळे रेल्वे प्रवाशांचे अतोनात हाल झाले.
पश्चिम उपनगरात शांतता ठेवण्यात पोलिसांना काही प्रमाणात यश आले. तरी सगळीकडे तणावाचे वातावरण मात्र कायम होते. कांदिवलीच्या दामूनगर परिसरात काही गट समतानगर पोलीस ठाण्यावर आंदोलन करणार होते. त्यामुळे दामूनगरकडून मोठा जमाव पोलीस ठाण्याच्या दिशेने येणार असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी वेळीच सावधानता बाळगली. परिणामी दुर्घटना टळली. मात्र या परिसरातील दुकाने बंद करण्यात आली होती. मालाडच्या कुरार परिसरातही तणावपूर्ण स्थिती होती. येथील अप्पापाडा, रमेश हॉटेल, तानाजीनगर, क्रांतीनगर परिसरात दुकाने बंद करण्यात आली होती.
चेंबूर परिसरात केलेल्या आंदोलनांमुळे सायन-पनवेल रोड, पूर्व द्रुतगती महामार्ग, गोवंडी येथील म्युनिसिपल रोड, अमर महल पूल, चेंबूर येथील व्ही.एन. पुरव मार्गांवर वाहतूककोंडी झाली होती.
वृद्ध, महिला आणि लहानग्यांचे हाल
मंगळवारी दुपारी साडेबारा वाजल्यापासून ते सायंकाळपर्यंत हजारो प्रवासी पटरीतून चालत इच्छित स्थळी जात असल्याचे पाहायला मिळाले. या वेळी दुपारच्या उन्हात पायपीट करावी लागल्याने वृद्ध, महिला आणि लहान मुलांचे हाल झाले. दिव्यांगांच्या डब्यातील काही दिव्यांग मात्र भेदरलेल्या अवस्थेत डब्यातच बसून होते. अनेक दिव्यांगांना इतर प्रवाशांनी रेल्वेतून खाली उतरवले. परंतु इच्छित स्थळ गाठण्यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला. काही प्रवासी लहान बाळांना घेऊन चालत होते, त्यांचीही मोठी दमछाक झाली.
घोषणाबाजी आणि शांततापूर्ण रॅली
गोरेगाव येथील एम.जी. आणि एस.व्ही. रोड परिसरात मंगळवारी सायंकाळी शांततापूर्ण रॅली पार पडली. येथे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. सांताक्रूझ परिसरातही घोषणाबाजी झाली. पोलिसांनी येथे वेळीच सावधानता बाळगत स्थिती नियंत्रणात आणली.
चेंबूरमध्ये रेल रोको, दुकाने बंद : चेंबूर रेल्वे स्थानकामध्ये सकाळी सव्वाअकराच्या सुमारास काही लोकांनी शिरकाव करत घोषणाबाजी केली. त्याचदरम्यान अजून एका जमावाने चेंबूर नाका येथेही रास्ता रोको केला. या आंदोलनाचा परिणाम सायन-पनवेल मार्गावर झाला. जमावाने चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनी, चेंबूर स्थानक परिसर, चेंबूर कॉलनी, सिंधी सोसायटी या भागांमध्ये घोषणाबाजी केली. चेंबूर स्थानक परिसरात दुकाने बंद करण्यात आली होती.
विद्यार्थ्यांची निदर्शने : कोरेगाव-भीमा येथील रॅलीवर झालेल्या भ्याड हल्ल्याविरोधात स्टुडंट्स फेडरेशन आॅफ इंडिया (एसएफआय) या विद्यार्थी संघटनेने वडाळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाबाहेर निषेध आंदोलन केले. या वेळी आंबेडकर महाविद्यालयासह इतर महाविद्यालयीन विद्यार्थीही आंदोलनात उतरले होते. ही घटना पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारी असून या घटनेची सीबीआय चौकशी करावी, दोषींवर कडक कारवाई करावी, या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.
पूर्व उपनगरात कोंडी
मुंबई-ठाणे या दोन शहरांना जोडत असलेल्या लाल बहादूर शास्त्री मार्गावर सायन, कुर्ला, विद्याविहार आणि घाटकोपर येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी झाली होती. या कोंडीमुळे बैलबाजार, अंधेरी-कमानी मार्गही कोंडीत सापडला. या मार्गावर झालेल्या कोंडीमुळे तासाहून अधिक काळ वाहनांचा एकाच जागी खोळंबा झाला. विशेषत: कुर्ला रेल्वे स्थानक, विद्याविहार रेल्वे स्थानक आणि घाटकोपर रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी वाहन उपलब्ध नसल्याने मुंबईकरांना त्रास सहन करावा लागला.
प्रवाशांची पायपीट : रेले रोकोमुळे रेल्वे प्रशासनाने कुर्ला ते वाशी हार्बर रेल्वे सेवा बंद केली. सूचना मिळेपर्यंत कुर्ला ते वाशी रेल्वेसेवा बंद राहील, अशा सूचना रेल्वे प्रशासनाने दिल्या. कित्येक रेल्वेगाड्या तीन ते चार तास स्थानकांदरम्यान उभ्या होत्या. तसेच रिक्षा, टॅक्सी आणि बसही उपलब्ध नसल्याने प्रवाशांनी चालत मानखुर्द आणि कुर्ला स्थानक गाठण्याचा प्रयत्न केला. या वेळी रेल्वेचे प्रवासी पटरीतून चालत होते.
दादर हिंदमाता कडकडीत बंद
मुंबईच्या उपनगरांतील बातम्या आगीप्रमाणे पसरल्यानंतर, सायंकाळी ५ वाजता दादर व हिंदमाता परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला. याउलट दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास नायगाव-दादर येथे ‘रास्ता रोको’चा प्रयत्न झाला. येथील बीडीडी चाळकºयांनी बॅनरच्या माध्यमातून आपला रोष व्यक्त केला.
तोडफोड, बंद आणि निदर्शने...
मुलुंडमध्ये सकाळपासूनच तीव्र पडसाद उमटताना दिसले. सकाळी १० वाजल्यापासून मुलुंड, भांडुप, कांजूर, विक्रोळी परिसरातील दुकानांचे शटर डाऊन करण्यात आले. या परिसरात गाड्या अडविण्याचा प्रयत्नही झाला. पूर्व द्रुतगती महामार्गही अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तामुळे यावर वेळीच नियंत्रण आणण्यात आले. मुलुंड स्टेशन परिसराबाहेर काही बस अडविण्याचा प्रयत्न झाला. मात्र पोलिसांनी त्यांना वेळीच अडविले.