एकाच दिवशी सात चोऱ्या
By admin | Published: July 19, 2014 12:44 AM2014-07-19T00:44:44+5:302014-07-19T00:44:44+5:30
शहर पोलिसांनी स्थापन केलेल्या ‘चाइल्ड प्रोटेक्शन युनिट’च्या उद्घाटनासाठी राज्याचे गृहमंत्री गुरुवारी ठाण्यात असताना शहरात एक नव्हे तर चोरीच्या तब्बल सात घटना घडल्या आहेत
ठाणे : शहर पोलिसांनी स्थापन केलेल्या ‘चाइल्ड प्रोटेक्शन युनिट’च्या उद्घाटनासाठी राज्याचे गृहमंत्री गुरुवारी ठाण्यात असताना शहरात एक नव्हे तर चोरीच्या तब्बल सात घटना घडल्या आहेत. घरफोडीच्या चार, मोबाइल-कारटेपची एक आणि दुचाकी-रिक्षा चोरीच्या दोन घटनांचा त्यात समावेश आहे. यामध्ये चोरट्यांनी शाळेतूनही रोकड लांबवल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कळव्यातील न्यू इंग्लिश स्कूलच्या उपमुख्याध्यापिकेच्या केबिनमधून ५०० रुपये चोरीला गेले आहेत. चोरट्याने केबिनच्या बाथरुमच्या खिडकीची काच फोडून आत प्रवेश केल्याची तक्रार शाळेचे सेक्रेटरी वसंत हुनूर यांनी केली आहे. दुसऱ्या घटनेत चरईतील राजेंद्र नाईक हे पत्नीस कामावर सोडण्यासाठी गेले असताना चोरट्यांनी त्यांचे घर फोडून सोन्याच्या दागिन्यांसह दोन अमेरिकन डॉलर असा ७३ हजारांचा ऐवज चोरून नेला. तिसऱ्या घटनेत, श्रीरंग सोसायटीतील भारती दास यांच्या घरातून ४३ हजार ५०० रुपये चोरीला गेले. चौथ्या घटनेत मुंबईतील सरोज कोटीयन यांच्या उथळसर येथील बंद घरातून जुन्या भांड्यांच्या तीन गोण्यांसह सिलिंग फॅन आणि कूलर असा ३ हजारांचा ऐवज चोरीला गेला. कळव्यातील रोहन पाटील यांच्या उभ्या केलेल्या कारची काच फोडून कारटेप आणि मोबाइल असा ८० हजारांचा ऐवज चोरला. तर भिवंडीचे फरीद शहा हे ठाण्यात आले असता त्यांनी पार्क केलेली दुचाकी चोरीला गेली. (प्रतिनिधी)