Join us

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांचे एकदिवसीय कामबंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 4:05 AM

मागण्या मान्य न झाल्यास २२ तारखेपासून बेमुदत आंदाेलनलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोना संकटाच्या सुरुवातीपासूनच हा संसर्ग ...

मागण्या मान्य न झाल्यास २२ तारखेपासून बेमुदत आंदाेलन

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना संकटाच्या सुरुवातीपासूनच हा संसर्ग रोखण्यात आणि संसर्गबाधितांचे प्राण वाचवण्यात विविध रुग्णालये आणि इतर आस्थापनांमधील डॉक्टरांची भूमिका अतिशय महत्त्वाची राहिलेली आहे. मात्र, तरीही त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याची नाराजी व्यक्त करत राज्यातील सर्व शासकीय, वैद्यकीय महाविद्यालयांमधील आणि रुग्णालयांमधील डॉक्टरांनी गुरुवारी एकदिवसीय कामबंद आंदोलन केले. सरकारने मागण्या मान्य न केल्यास येत्या २२ तारखेपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशाराही वैद्यकीय महाविद्यालय वैद्यकीय अधिकारी संघटना महाराष्ट्र यांनी दिला आहे. जे.जे. रुग्णालयातही सर्व डॉक्टरांनी एकत्र येऊन कामबंद आंदोलन केले, तर राज्याच्या अन्य शासकीय महाविद्यालयांतील डॉक्टरांनीही कामबंद आंदोलन केले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत घ्यावे, त्यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन द्यावे, अशी मागणी हे डॉक्टर गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने करत आहेत. सरकारने दरवेळी त्यांना मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आणि आंदोलन मागे घेण्यास भाग पाडले. मात्र, मागण्या मान्य न झाल्याने अखेर संतप्त डॉक्टरांनी आता मागण्या मान्य केल्या नाहीत, तर २२ एप्रिलपासून बेमुदत आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला.

कोरोना काळात दिवसरात्र सेवा देऊनही मागण्या दुर्लक्षित

कोरोनाच्या संकटाच्या काळात एकही दिवस सुटी न घेता डॉक्टरांनी काम केले. तरीही मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. मागण्या लवकरात लवकर मान्य व्हाव्यात, अशी आमची मागणी असल्याचे संघटनेचे आंदोलनकर्ते डॉ. रेवत कानिंदे यांनी सांगितले.

......................................