Join us

एका दिवसात जमा झाला दीड दिवसाचा जलसाठा; पाच हजार दशलक्ष लीटर पाण्याची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 5:42 AM

गेल्या काही वर्षांमध्ये मान्सून उशिरा मुंबईत येत असल्याचे दिसून आले आहे. मात्र भीषण पाणीटंचाईचा सामना यापूर्वीही केला असताना आजही महापालिका आणि मुंबईकर पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहेत.

मुंबई : तलाव क्षेत्रातही पावसाची हजेरी लागत असल्याने जलसाठ्यात हळूहळू वाढ होऊ लागली आहे. शनिवारी सकाळपर्यंत तलावांमध्ये पाच हजार ८१६ दशलक्ष लीटरने जलसाठा वाढला होता. पाणीबाणीच्या परिस्थितीत गेल्या २४ तासांत तलावांमध्ये वाढलेला दीड दिवसांचा जलसाठाही मुंबईसाठी सुखद ठरला आहे. ही वाढ अत्यल्प असली तरी मुंबईवर पाणी संकट घोंघावत असताना पावसाची हजेरी दिलासादायक ठरली आहे.गेल्या काही वर्षांमध्ये मान्सून उशिरा मुंबईत येत असल्याचे दिसून आले आहे. मात्र भीषण पाणीटंचाईचा सामना यापूर्वीही केला असताना आजही महापालिका आणि मुंबईकर पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहेत.गेल्या वर्षी परतीच्या पावसाने दगा दिल्यानंतर पाणीकपात हा एकच मार्ग पालिकेपुढे उरला होता. दरवर्षी अपेक्षित जलसाठ्यापेक्षा नऊ टक्के जलसाठा कमी असल्याने १५ नोव्हेंबरपासून मुंबईत सरसकट १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे.तलावांमधील पाण्याची पातळी झपाट्याने घसरत असताना मान्सून मात्र लांबणीवर पडला. त्यामुळे काही दिवसांपूर्वीच महापालिकेने राखीव कोट्यातून पाणीपुरवठा करणे सुरू केले होते. तलावांमध्ये शुक्रवारी जेमतेम साडेचार टक्के जलसाठा शिल्लक होता. ३१ जुलैपर्यंत हे पाणी पुरेल, असा पालिकेचा दावा आहे. मान्सूनने आगमन करताच मुंबईसह तलाव क्षेत्रांतही हजेरी लावली आहे.मुंबईला वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी तलावांमध्ये १ आॅक्टोबर रोजी १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर जलसाठा असणे अपेक्षित आहे. गळती व चोरीमुळे दररोज २५ टक्के म्हणजे सुमारे नऊशे दशलक्ष लीटर पाणी वाया जाते. मुंबईला दररोज तीन हजार ८०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा करण्यात येतो. १५ नोव्हेंबर २०१८ पासून मुंबईत १० टक्के पाणीकपात लागू आहे.

टॅग्स :मुंबई