Join us

कुर्ला-मुलुंड रेल्वे स्थानकांदरम्यान दररोज एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2018 6:01 AM

वाढती गर्दी, रेल्वे रूळ ओलांडणाऱ्यांच्या संख्येत वाढ : गेल्या तीन वर्षांमध्ये ९७३ जणांनी गमावले प्राण

मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाºया लोकलमध्ये दोन ते तीन प्रवाशांचा रोज मृत्यू होत आहे. सर्वांत मोठा आकडा हा कुर्ला ते मुलुंड रेल्वे स्थानकांमधील असून गेल्या तीन वर्षांत या मार्गावर ९७३ जणांनी आपले प्राण गमावले आहेत. तर ६९७ जण जखमी झाले आहेत. यामध्ये अनेकांना कायमचे अपंगत्वदेखील आले आहे. कुर्ला ते मुलुंड या स्थानकांदरम्यान दररोज एका प्रवाशाचा पडून मृत्यू होत आहे.

वाढती गर्दी, रेल्वे रूळ ओलाडणाºयांच्या संख्येत होणारी वाढ यामुळे अपघात आणि मृतांच्या संख्येत वाढ होत असल्याचे रेल्वे पोलिसांकडून सांगण्यात आले. गर्दीच्या काळात लोकल गाड्यांत चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण होते. सर्वाधिक गर्दीच्या स्थानकांमध्ये घाटकोपर आणि कुर्ला ही स्थानके अग्रस्थानी आहेत. लोकल अपघातांमध्ये मुंबईत वाढणारा मृत्यूचा आकडा कमी करण्यासाठी पोलीस नेहमीच जनजागृतीदेखील करीत असतात. मात्र तरीही अनेक प्रवासी रोजच लोकलच्या दरवाजामध्येच उभे राहून प्रवास करताना पाहायला मिळतात. तर पादचारी पूल असतानाही रेल्वे रूळ ओलांडत असतात. त्यामुळे गेल्या काही वर्षांत हजारो मुंबईकरांना आपला प्राण गमवावा लागला आहे.

कुर्ला ते मुलुंड रेल्वे स्थानकांदरम्यान २०१६मध्ये ३८७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २९१ जण जखमी झाले आहेत. २०१७मध्ये ३३१ जणांचा मृत्यू झाला असून २२९ जण जखमी झाले आहेत. यामध्ये २९७ पुरुष असून ३४ स्त्रिया आहेत. यातील २४७ जणांची ओळख पटली आहे. तर ८४ जणांची अद्यापही ओळख पटलेली नाही. या वर्षीदेखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात झाले असून जानेवारी २०१८पासून १८ सप्टेंबर २०१८पर्यंत या ठिकाणी २५५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १७८ जण यामध्ये जखमी झाले आहेत. यामध्ये २२९ पुरुष असून स्त्रियांची संख्या २६ आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत कुर्ला आणि मुलुंड या स्थानकांदरम्यान मृत्यूचा हा आकडा वाढतच आहे. लोकलच्या दरवाजामध्ये उभे राहून प्रवास करू नका, दरवाजामध्ये स्टंटबाजी करू नका, रेल्वे रूळ पार करू नका, प्रवाशांनी आपल्यासोबत आपल्या कुटुंबीयांचादेखील विचार करून प्रवास करावा, असे अवाहन कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बलवंतराव यांनी केले आहे. 

टॅग्स :मुंबईलोकल