मुंबई : राज्यातील जनतेने ‘मन की बात’ ऐकताना ‘वन की बात’ केल्यामुळे वनेतर क्षेत्रातील वृक्षाच्छादनामध्ये राज्य देशात पहिल्या क्रमांकावर आले. भारतीय वन सर्व्हेक्षण अहवालानुसार राज्यात दोन वर्षात या क्षेत्रात २७३ चौ.कि.मी.ची वाढ झाली. याचे सर्व श्रेय शासनाचा वृक्षलागवड कार्यक्रम, पर्यावरण रक्षणात सहभागी झालेल्या जनतेला आणि संस्थांना आहे, असे प्रतिपादन वनमंत्री सुधीर मुनगंटीवारयांनी केले.राज्यात १ जुलै ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत होणाऱ्या १३ कोटी वृक्ष लागवडीच्या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यासाठी तसेच या उपक्रमाची माहिती देण्यासाठी मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील अध्यात्मिक आणि धार्मिक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक शनिवारी सह्याद्री अतिथीगृहात झाली. बैठकीस आमदार मंगल प्रभात लोढा, वन सचिव विकास खारगे यांच्यासह राज्यभरातील वनाधिकारी आणि धार्मिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. स्वामीनारायण संस्था, पतंजली योग समिती, ईशा फाउंडेशन, पतंजली आयुर्वेद कंपनी लि., महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट, अनिरुद्ध अकादमी आॅफ डिसॅस्टर मॅनेजमेंट, जीवनविद्या मिशन, तुलसी भवन बालमित्र मंडळ आदी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.केंद्र सरकारने अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने भारतातील वनांचा अभ्यास करून अहवाल जाहीर केला. ज्यामध्ये चार क्षेत्रात महाराष्ट्र देशात पहिले आले. त्यामध्ये वनेत्तर क्षेत्रातील वृक्षाच्छादनाशिवाय वनक्षेत्रात वॉटर बॉडिज निर्माण करणे, बांबू लागवड आणि कांदळवन संरक्षण आणि संवर्धन यांचा समावेश आहे, असे मुनगंटीवार म्हणाले.सगळीच रोपे जगतात असेही नसते. त्यामुळे या कामात सहभागी लोकांच्या मनात संदिग्धता निर्माण करू नका, उलट या कामात अधिकाधिक संख्येने सहभागी व्हा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. वृक्ष लागवडीसाठी उपलब्ध असलेल्या लॅण्ड बँकेची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाईल, असेही ते म्हणाले.
वृक्षरोपणात महाराष्ट्र देशात पहिला, भारतीय वन सर्वेक्षण अहवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2018 6:09 AM