एकाच दिवशी १६ प्रवाशांनी गमावला जीव, रेल्वे मार्गावरील अपघात सत्र सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 05:23 AM2019-07-20T05:23:22+5:302019-07-20T05:23:29+5:30
मुंबई उपनगरीय लोकल प्रवासात गुरुवार, १८ जुलै रोजी १६ प्रवाशांचा मृत्यू आणि १३ प्रवासी जखमी झाल्याची नोंद पोलिसांनी केली आहे.
मुंबई : मुंबई उपनगरीय लोकल प्रवासात गुरुवार, १८ जुलै रोजी १६ प्रवाशांचा मृत्यू आणि १३ प्रवासी जखमी झाल्याची नोंद पोलिसांनी केली आहे. रेल्वे रूळ ओलांडणे, धावत्या लोकलमधून पडणे तसेच खांब लागल्यामुळे या दुर्घटना घडल्या. त्यामुळे लोकल प्रवास जीवघेणा ठरत असल्याचे पुन्हा एकदा उघडकीस आले आहे.
मध्य रेल्वे मार्गावरील कुर्ला, ठाणे, डोंबिवली, कल्याण या स्थानकांवर गुरुवारी एकूण १० प्रवाशांचा मृत्यू झाला. तर, हार्बर मार्गावरील पनवेल, वाशी या स्थानकांवर २ आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई सेंट्रल, वांद्रे, बोरीवली तसेच वसई या स्थानकांवर एकूण ४ प्रवाशांना जीव गमवावा लागला. या १६ मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे.
याचप्रमाणे मध्य रेल्वे मार्गावरील सीएसएमटी, दादर, कुर्ला, ठाणे, कल्याण या स्थानकांवर एकूण ९ प्रवासी, पश्चिम रेल्वे मार्गावरील बोरीवली, वसई या स्थानकांवर एकूण ३ आणि हार्बर मार्गावरील वाशी स्थानकावर एक प्रवासी जखमी झाला. उपनगरीय लोकल मार्गावरील एकूण १३ जखमी प्रवाशांमध्येही एका महिलेचा समावेश आहे.
दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून लोकल वेळापत्रकानुसार चालविण्यात येत नसल्याने प्रवाशांच्या मृत्यूचे प्रमाण वाढते आहे. त्यामुळे एका लोकलमध्ये दोन ते तीन लोकलचे प्रवासी प्रवास करतात. परिणामी धावत्या लोकलमधून प्रवासी पडून त्यांचा मृत्यू होतो, अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली.
तर रेल्वे रुळ ओलांडू नये यासाठी जनजागृती करूनही प्रवासी त्याकडे दुर्लक्ष करतात आणि अपघात घडतात, अशी खंत रेल्वे प्रशासनाने व्यक्त केली. तसेच रेल्वे प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी संरक्षक भिंत उभारणे तसेच अन्य उपाययोजनांसह मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत असल्याचेही स्पष्ट केले.
>प्रवास जीवघेणा
रेल्वे प्रवासादरम्यान २६ जून रोजी शून्य मृत्यूची नोंद पोलीस ठाण्यात केली होती. मात्र याच दिवशी रेल्वे प्रवासात ११ प्रवासी जखमी झाले होते. यामध्ये ठाणे स्थानकात २, कुर्ला, चर्चगेट, अंधेरी, वसई स्थानकात प्रत्येकी १, कल्याण ३, तर मुंबई सेंट्रल स्थानकात २ प्रवासी जखमी झाले. त्यानंतर अपघातांचे सत्र सुरूच असून गुरुवारी एकाच दिवशी १६ प्रवाशांनी जीव गमावला आहे. त्यामुळे रेल्वे प्रवास जीवघेणा ठरत असून असुरक्षिततेची भीती वाढत असल्याचे चित्र आहे.
>प्रवास असुरक्षित
रेल्वे प्रवासादरम्यान २६ जूनला शून्य मृत्यूची नोंद पोलीस ठाण्यात झाली. मात्र याच दिवशी ठाणे स्थानकात २, कुर्ला, चर्चगेट, अंधेरी, वसईत प्रत्येकी १, कल्याण ३, तर मुंबई सेंट्रल स्थानकात २ असे एकूण ११ प्रवासी जखमी झाले. त्यामुळे रेल्वे प्रवास असुरक्षित असल्याचे चित्र आहे.
>सुरक्षेची काळजी
घेणे गरजेचे
रेल्वे रूळ ओलांडताना आणि गर्दीमुळे धावत्या लोकलमधून पडून प्रवाशांचा मृत्यू जास्त प्रमाणात होतो. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने रेल्वे रूळ ओलांडण्याच्या ठिकाणी सुरक्षा भिंत, जाळ्या बसविणे आवश्यक आहे. लोकल फेऱ्यांची संख्या वाढविण्यासाठी प्रशासनाने सकारात्मक असले पाहिजे.
- राजेश घनघाव, अध्यक्ष कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे संघटना
>स्थानक मृत्यू जखमी
कुर्ला ३ १
ठाणे ३ १
कल्याण २ ४
डोंबिवली २ -
पनवेल १ -
वाशी १ १
मुंबई सेंट्रल १ -
वांद्रे १ -
बोरीवली १ २
वसई १ १
सीएसएमटी - २
दादर - १