एकीकडे रेल्वे सेवा ठप्प असल्याने प्रवासी त्रस्त, रेल्वेमंत्री मात्र लालबागच्या राजाच्या दर्शनात तल्लीन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2019 05:24 PM2019-09-04T17:24:42+5:302019-09-04T17:28:14+5:30
रेल्वेची पाहणी करण्याऐवजी गोयल मात्र राजाच्या दर्शनात तल्लीन असल्याची टीका केली जात आहे.
मुंबई - मुंबईमध्ये कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईची लाईफलाईन असलेली लोकलसेवा ठप्प झाल्याने मुंबईकरांचे आतोनात हाल झाले आहेत. तिन्ही मार्गांवरील लोकल ट्रेनची वाहतूक ठप्प झाली आहे. एकीकडे मुंबईकर रेल्वे बंद पडल्याने त्रस्त झालेले असतानाच रेल्वेमंत्री पियुष गोयल मात्र लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक झाले. यामुळे सामान्य मुंबईकरांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. गोयल यांनी आज दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. मुंबई ठप्प झालेली असतानाचा दळणवळणाचे प्रमुख साधन असलेल्या रेल्वेची पाहणी करण्याऐवजी गोयल मात्र राजाच्या दर्शनात तल्लीन असल्याची टीका केली जात आहे. मुंबईत रेल्वे सेवा ठप्प झालेली असताना रेल्वेमंत्री देवदर्शनात मग्न असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
आज सकाळपासूनच कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईमधील मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अजूनही रेल्वे ट्रॅकवर तुडुंब पाणी भरल्याने रेल्वे सेवा खोळंबल्या अवस्थेत आहे. मध्य रेल्वेच्या मार्गावरील कुर्ला, शीव, कांजूरमार्ग, विक्रोळी आणि घाटकोपर स्थानकांमध्ये रुळावर पाणी साठल्याने ठाणे ते सीएसएमटी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. तसेच हार्बर मार्गावरही ठाणे-वाशी आणि ठाणे-पनवेल मार्ग वगळता इतर सर्व मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. पश्चिम रेल्वेवरील वाहतूकही उशिराने सुरु असून अनेक प्रवाशी लोकलमध्ये तासन्तास अडकून पडले आहेत. अशा अवस्थेत मुंबईत असताना रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ठप्प झालेल्या रेल्वेची पाहणी करणं अपेक्षित होतं. मात्र, तसे न घडल्याने उलटपक्षी ते लालबागच्या राजाच्या दर्शनात तल्लीन असल्याचे पाहायला मिळत आहे.