Join us

एक हात मदतीचा : १०६ कुटूंबियांना ५० हजार रुपयांच्या साहित्याचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 5:59 PM

तांदुळ, गहु, कांदा आणि तेलाचे वितरण...

मुंबई : कोरोनाला थोपविण्यासाठी आता लॉक डाऊनचा कालावधी आता आणखी वाढविण्यात आला आहे. ३० एप्रिलपर्यंत लॉक डाऊन वाढविण्यात आल्याने लोकांना जीवनाश्यक साहित्य मिळावे म्हणून विजेचा पुरवठा करणारी महावितरण कंपनीदेखील सरसावली आहे. महावितरणकडून मिळालेल्या माहितीनुसार, १०६ कुटूंबियांना ५० हजार रुपयांच्या साहित्याचे वितरण करण्यात आले आहे.

महावितरणने सांगितले की, वाढत चाललेल्या कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात ३० एप्रिल पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. हातावर पोट असलेल्या गरीब आदिवासी  व मजूर यांच्या पुढे खूप संकट निर्माण झाला आहे. अशा या परिस्थितीत, मदतीचा एक हाथ म्हणून महावितरणच्या भांडूप परिमंडलातील अभियंत्यांनी चिंचवाडी या आदिवासी वाडीत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. संचारबंदीच्या काळात महावितरणच्या  प्रत्येक अधिकारी व कर्मचारी अखंडित वीजपुरवठा देण्यासाठी काम करीत आहे. त्यासोबतच माणुसकीसाठी व आपली सामाजिक बांधिलकी न विसरता, महावितरणच्या अभियंत्यांनी वर्गणी करुन चिंचवाडी या आदिवासी वाडीतील एकूण ४६ घरांना प्रत्येकी ५ किलो तांदूळ, २ किलो गव्हाचे पीठ,  २ किलो बटाटा, २ किलो कांदा, १ लिटर  तेल असे आवश्यक वस्तूचे वाटप केले. तसेच कातकर वाडीतील  ४० घरे  व महावितरणमध्ये काम करत असलेल्या २० आऊटसोर्सिंग कर्मचा-यांच्या कुटुंबाना असे एकूण १०६ कुटुंबांना एकूण ५० हजार रुपयांच्या वस्तू वाटप केले. या कृतीमुळे उपाशीपोटी असलेल्या या आदिवासी वाडीतील लोकांना आधार मिळाला आहे. दरम्यान, यावेळी राजाराम माने यांच्या सोबत माणिक राठोड, गायकवाड, शामकांत बोरसे, जयदीप नानोटे, आर. जे. पाटील, रमेश राठोड, डी. के. मोरे, संजय ठाकूर, महाडिक,  यमगार सहभागी होते. महावितरणच्या मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण यांनी त्यांचे कौतुक केले व  सक्षम असलेल्या लोकांनी या कोरोनाच्या संकटात शक्य असल्यास गरीबांची  मदत करावी, असे आवाहनही  केले. 

टॅग्स :कोरोना सकारात्मक बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस