मुंबई : शेकडो लोकल, हजारो लोकल फेऱ्या आणि लाखो प्रवासी संख्या असणाऱ्या उपनगरीय लोकलवर दिवसेंदिवस प्रवाशांचा भार वाढतच जात आहे. त्यामुळे सकाळ असो वा संध्याकाळ प्रवाशांना लोकलमधून प्रवास करताना गर्दीचा सामना हा करावा लागतच आहे. मध्य रेल्वे मार्गावर सकाळी ९ ते १0 आणि रात्री सात ते आठ या वेळेत तर हार्बर मार्गावर सकाळी ८ ते ९ आणि पश्चिम रेल्वे मार्गावरही सकाळी ९ ते १0 आणि ६ ते ७ या वेळेत लोकल गाड्यांना प्रचंड गर्दी होत आहे. एमआरव्हीसीने (मुंबई रेल्वे विकास महामंडळाचा २0१३ चा अहवाल) केलेल्या एका सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. मध्य रेल्वेची मेन आणि हार्बर लाइन तसेच पश्चिम रेल्वे मार्गावर सध्या ७५ लाख प्रवासी प्रवास करतात. गेल्या दोन वर्षांतील रेल्वे अर्थसंकल्पात ७२ आणि ७२ अशा लोकल फेऱ्याही मिळालेल्या आहेत. तर टप्प्याटप्प्याने ७२ नवीन लोकल गाड्याही प्रवाशांच्या दिमतीला येणार आहेत. वाढीव लोकल फेऱ्यांमुळे लोकलमधील गर्दी बरीचशी कमी होईल, असा रेल्वे प्रशासनाला अंदाज होता. मात्र फेऱ्या मिळूनही लोकलची गर्दी काही कमी होत नसल्याचे समोर आले आहे. लोकल गाड्यांना आणि स्थानकांवर होत असलेल्या गर्दीमुळे प्रवाशांना आणखी काही सेवा गर्दीच्या वेळेत उपलब्ध करता येतील का, स्थानकांवर आत आणि बाहेर जाण्याच्या मार्गावर पादचारी पूल, सरकते जिने कसे उपलब्ध करता येतील, लोकल, पादचारी पूल आणि स्थानकांवरील गर्दीवर नियंत्रण कसे ठेवता येईल आणि नवीन लोकल आल्यास गर्दी किती कमी होईल यादृष्टीने एमआरव्हीसीने २0१३ मध्ये खासगी संस्थेच्या साहाय्याने एक सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणानुसार या एका तासात प्रवाशांची सर्वाधिक गर्दी असल्याचे समोर आले आहे. लोकलमध्ये आणि स्थानकांवर सकाळी सात ते सकाळी साडेअकरा आणि सायंकाळी ४ ते रात्री साडेआठ या वेळेत होणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीची माहिती घेण्यात आली. या वेळेत लोकल गाड्यांना प्रचंड गर्दी होत असल्याचे सांगण्यात आले आहे. सर्वेक्षणानुसार मध्य रेल्वे मार्गावर सकाळी ७ ते सकाळी ११.३0 वाजेपर्यंत १0१ लोकल फेऱ्यांमधून ७ लाख ६0 हजार प्रवासी प्रवास करतात. तर सायंकाळी चार ते रात्री साडेआठ या वळेत ९९ फेऱ्या लोकलच्या होतानाच त्या वेळेत ७ लाख ६१ हजार प्रवासी प्रवास करत आहेत. हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर दोनच रूळ असून गर्दीच्या वेळेत ४ लाख प्रवासी प्रवास करत असल्याचे सांगण्यात आले आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर सकाळी सात ते सकाळी ११.३0 पर्यंत १५३ लोकल फेऱ्यांमधून ११ लाख २४ हजार प्रवासी चर्चगेटच्या दिशेने आणि सायंकाळी चार ते रात्री साडेआठ या वेळेत १३४ फेऱ्यांमधून १0 लाख १८ हजार प्रवाशांचा विरार आणि डहाणूच्या दिशेने प्रवास होत आहे.
एक तास टोकाच्या गर्दीचा...
By admin | Published: July 31, 2014 1:28 AM